नवे पीपीई किट म्हणजे संसर्गाआधीच मरण्याचे साधन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:09 IST2021-04-01T04:09:01+5:302021-04-01T04:09:01+5:30
- डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुदरमतोय श्वास - जुन्याच किटची केली जातेय मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पीपीई किटची ...

नवे पीपीई किट म्हणजे संसर्गाआधीच मरण्याचे साधन!
- डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुदरमतोय श्वास
- जुन्याच किटची केली जातेय मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पीपीई किटची आधी नव्हत्या असे नाही. मात्र, कोरोना संसर्गाने या किटची ओळख साऱ्या जगाला झाली आहे. संक्रमितावर उपचार करताना, बाधिताची ओळख पटविण्यासाठी केल्या जाणाऱ्या तपासणीवेळी, संक्रमिताच्या डेड बॉडीजची विल्हेवाट लावताना संबंधित कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक म्हणून या पीपीई किट सर्वदूर दिसत आहेत. एका अर्थाने कोणी पीपीई किट घातलेला दिसला की जवळपास कोरोना संक्रमित असल्याची धास्ती अनेकांच्या मनात निर्माण होते. मात्र, या पीपीई किट अत्यावश्यक म्हणून वापर कर्त्यांना जिवघेण्या ठरत आहेत. नव्या पीपीई किट तर नकोच, या पीपीई किट म्हणून कोरोना संसर्ग होण्याआधीच मरण्याचे साधन असल्याची भीती डॉक्टर, वैद्यकीय व इतर कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
कोरोना संसर्गामुळे पीपीई किट आता भारतात तयार व्हायला लागल्या आहेत. या किट पूर्णत: वायूबंद असल्याने आणि दीर्घकाळ घालून उपचार करावे लागत असल्याने संबंधिताचा श्वास गुदमरतो, हे सर्वश्रुत आहे. मात्र, कर्तव्यापोटी कोरोना योद्धयांनी हे सर्व त्रास सहन केले. आठ-आठ तास ही किट घालून राहणे म्हणून विना पाणी, विना वारा अशीच स्थिती. अशात संबंधित योद्धा घामाघूम झालेला असतो. तहान लागली असतानाही तो पाणी पिऊ शकत नाही. त्यातच राज्य शासनाने नव्या पीपीई किटचे वितरण मोठ्या प्रमाणात केले आहे. मात्र, या नव्या किट पूर्वीपेक्षा भयंकर असल्याने कर्मचारी हे किट नकोच, असे म्हणत आहेत. या नव्या किट रेनकोटसारख्या असून, अतिशय कडक आहेत. त्यामुळे संबंधितांना दीर्घकाळ घालून राहणे अवघड झाले आहे. अनेकांना डिहायड्रेशनमुळे शुद्ध हरपण्याचा त्रास जाणवायला लागला आहे. त्यामुळे, जुन्याच किट मागविण्याची किंवा उच्च दर्जाची किट मागविण्याची विनंती केली जात आहे.
----------------
जिल्ह्यातील एकूण संक्रमितांचा आकडा
एकूण कोरोनाबाधित - २,२६,०३८
बरे झालेले रुग्ण - १,८१,६०९
उपचार सुरू - ३९,३३१
कोरोनाबळी - ५,०९८
----------
* जीव गुदमरतोय
संक्रमितांची बॉडी स्मशान घाटावर नेताना पीपीई किट घालून राहावे लागते. त्यात आता उन्हाळा आपल्या तीव्रतेवर आहे. अशा स्थितीत पीपीई किट फेकून द्यावीशी वाटते. बऱ्याचदा नाइलाजाने तोंड बाहेर काढावेच लागते.
- संक्रमितांच्या डेडबॉडीची विल्हेवाट लावणारा कर्मचारी
* नव्या किट त्वचेला बाधक
जुन्या किटने जीव गुदमरत होता; पण नव्या किट तर भयंकर आहेत. कडक असल्याने त्वचेला खरकटे पडत आहेत. आधीच घामाघूम आणि त्यात झालेल्या जखमा, वेदनांना वाट मोकळी करतात.
- संक्रमितांवर उपचार करणारा डॉक्टर
* श्वास गुदमरल्याने चक्कर येते
पूर्णत: बंद असल्याने या पीपीई किटमधून पाणी पिताही येत नाही. उन्हाळा प्रचंड वाढला आहे. अशा स्थितीत बऱ्याचदा श्वास गुदमरून चक्कर येण्याची शक्यता असते.
- परिचारिका
-----------------
उच्च दर्जाच्या पीपीई किटची मागणी
मेयो, मेडिकलमध्ये नव्या पीपीई किट आल्या आहेत. या किट रेनकोटच्या कापडासारख्या कडक आहेत. १५ ते २० मिनिटांतच व्यक्ती घामाघूम होतो. त्यातच उन्हाळा जोरदार आहे. अधिष्ठात्यांकडे आम्ही जुन्या किंवा उच्च दर्जाच्या पीपीई किटची मागणी केली आहे. अशी माहिती एका निवासी डॉक्टरने आपली ओळख लपविण्याच्या अटीवर दिली आहे.
..................