१४०० कोटीतून साकारणार ‘न्यू नागपूर’, नगरविकास विभागाची मंजुरी
By गणेश हुड | Updated: September 17, 2022 20:53 IST2022-09-17T20:52:30+5:302022-09-17T20:53:19+5:30
शहरालगतच्या गावांत पाणीपुरवठा व सिवेज लाईन टाकणार

१४०० कोटीतून साकारणार ‘न्यू नागपूर’, नगरविकास विभागाची मंजुरी
नागपूर : शहरालगतच्या भागाचा विकास करण्याची संकल्पना नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एनएमआरडीए) मांडली होती. या प्राधिकरणच्या १४०० कोटींच्या विकास योजनांना नगर विकास विभागाने मंजुरी दिली आहे. यात १४०० किलोमीटर लांबींच्या जलवाहिन्या व सिवेज लाईन टाकण्यात येणार आहे. यामुळे नवीन नागपूरच्या विकासाला गती मिळणार आहे.
मागील काही वर्षात नागपूर शहराच्या विकासोबतच लगतच्या सीमेवरील बेसा, बेलतरोडी, पिपळा, बहादुरा, कामठी, कोराडी, वाडी, हिंगणा, बुटीबोरीपर्यंत लहान मोठ्या गावांचा समावेश आता शहरातच झाला आहे. यातूनच नवीन नागपूरची संकल्पना पुढे आली. लगतच्या गावांच्या विकासाचा आराखडा एनएमआरडीने मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविला होता.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात एनएमआरडीएची स्थापना करण्यात आली होती.जवळपास ७५० गावांचा एनएमआरडीए क्षेत्रात समावेश करण्यात आला. एनएमआरडीएने या क्षेत्रात बांधकाम नियमावली लागू केली आहे. आता या क्षेत्राच्या विकासासाठीही एनएमआरडीए आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी पावले उचलली आहेत.
२४ गावांतील ८.५० लाख लोकांना लाभ
केंद्र सरकारच्या अमृत-२ या योजनेंतर्गत एनएमआरडीएच्या सेक्टर साऊथ बी मध्ये समावेश असलेली १३ व ईस्ट ए सेक्टरमध्ये समावेश असलेल्या ११ गावांमध्ये विकास कामे करण्यास मंजुरी दिली. या प्रकल्पाचा लाभ ८१ चौरस किमी क्षेत्रातील ८ लाख ५० हजार नागरिकांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे.
सेक्टर साऊथ - बी
बेसा, बेलतरोडी, पिपळा, घोगली, हुडकेश्वर खुर्द, शंकरपूर, गोटाळपांजरी, वेळाहरी, रुई, वरोडा, पांजरी, किरणापूर, कन्हानळगाव या गावांचा समावेश आहे.
सेक्टर ईस्ट- ए
पांढुर्णा, तरोडी खुर्द, तरोडी बुजूर्ग, बीडगाव, कापसी खुर्द, पोवारी, अड्याळी, विहिरगाव, गोनी सिम, खरबी, बहादुरा आदींचा समावेश आहे.
-साऊथ बी सेक्टरमध्ये ५६५.२५ कोटी खर्च करून ५६५ कि.मी. लांबीच्या जलवाहिनीचे जाळे निर्माण करणार
-साउथ-बी मध्ये २२०.९० कोटी तर ईस्ट ए मध्ये ३४४.३६ कोटी खर्च करणार
- ५२२ किमी लांबीच्या सिवेज लाईन टाकण्यासाठी ७८८.८७ कोटी खर्च करणार
- साऊथ बीमध्ये २२० तर ईस्ट एमध्ये ३०२ किमीच्या सिवेज लाइनचे जाळे तयार करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अमृत-२ योजनेंतर्गत शहरालगतच्या एनएमआरडीए क्षेत्रात सिवेज लाइन व जलवाहिनीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. हा प्रकल्प नवीन नागपूरचा पाया रचणारा ठरणार आहे. एक-दिड महिन्यात तांत्रिक मंजुरी व निधीची तरतूद होईल.
मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, एनएमआरडीए.