लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या वेगाने वाढणाऱ्या विस्तारास सामोरे जाण्यासाठी आणि नागपूरकरांना सुलभ, सुरक्षित व सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवण्यासाठी सुमारे २५,५६७ कोटींचा व्यापक गतिशीलता आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मेट्रो भवन येथे झालेल्या बैठकीत या आराखड्याचा आढावा घेण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'हा आराखडा फक्त वाहतुकीसाठी नाही, तर नागपूरच्या शहरी विकासाची दिशा ठरवणारा दस्तऐवज ठरणार आहे." त्यांनी नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनीही आपली मते नोंदवावीत, असे आवाहनही या वेळी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनांच्या वाढत्या संख्येची दखल घेत, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी या आराखड्याच्या अंमलबजावणीस गती देण्याचे निर्देश दिले. तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या उपनगरी भागांमध्येही या आराखड्याचा लाभ पोहोचवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हे होते बैठकीस उपस्थितया बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आ. कृष्णा खोपडे, आ. प्रवीण दटके, आ. समीर मेघे, आ. चरणसिंग ठाकूर, आ. संजय मेश्राम, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे, राजीव त्यागी आदी उपस्थित होते.
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार केलेला आराखडानागपूर शहरासाठीचा पहिला आराखडा २०१३ मध्ये नागपूर सुधार प्रन्य प्रन्यासने तयार केला होता. त्यानंतर जुलै २०१८ मध्ये महामेट्रो यांनी नव्याने सर्वेक्षण व सल्लामसलतीनंतर यामध्ये सुधारणा केली. नागपूरचा वाढता विस्तार लक्षात घेऊन या आराखड्यात नव्याने संशोधन करून भविष्यातील व्यापक गरजांचा विचार व नागरिकांना अधिका अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली सल्लामसलत बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्राप्त झालेल्या सूचनांवर आधारित हा नवीन सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यावर रविवारी लोकप्रतिनिधींसमवेत व्यापक चर्चा करण्यात आली.
आराखड्याचे वैशिष्ट्ये
- नवीन रस्त्यांची निर्मिती, चौकांचे विस्तारीकरण, सुरक्षित फुटपाथ व सायकल ट्रॅक
- मेट्रो स्टेशनपासून बसेसची कनेक्टिव्हिटी, सार्वजनिक वाहतुकीचे मार्ग सुलभ
- मिहान, कोराडी, कामठीसारख्या भागात औद्योगिक परिसरांशी जोडणाऱ्या रस्त्यांचे नियोजन
- गणेशपेठ व मोरभवन बसस्थानकाचा विकास, तसेच परसोडी, कापसी, कामठी इत्यादी भागांत बस हब