सेंट्रल एव्हेन्यूला नवीन ‘लुक’
By Admin | Updated: January 22, 2015 02:36 IST2015-01-22T02:36:13+5:302015-01-22T02:36:13+5:30
उपराजधानीतील सेंट्रल एव्हेन्यूवर दिवसभर वाहतुकीची प्रचंड कोंडी दिसून येते. यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी.

सेंट्रल एव्हेन्यूला नवीन ‘लुक’
नागपूर : उपराजधानीतील सेंट्रल एव्हेन्यूवर दिवसभर वाहतुकीची प्रचंड कोंडी दिसून येते. यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी. संविधान चौक ते भंडारा मार्ग या व्यस्ततेच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होणार आहे. शिवाय गोळीबार चौकात उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यामुळे वाहतुकीच्या कोंडीपासून नागपूरकरांची सुटका होणार आहे. शिवाय शहराच्या मध्यभागातून जाणारा आणि पूर्व व पश्चिमेला जोडणारा सेंट्रल एव्हेन्यू सिमेंट काँक्रिटचा ‘सुपर एक्स्प्रेस वे’ होणार आहे.
गोळीबार चौक परिसरात उड्डाण पूल व्हावा ही बऱ्याच काळापासूनची मागणी आहे. तसेच सेंट्रल एव्हेन्यूवरील एक मार्ग चांगला झाला की दुसरा मार्गावर खड्डे अशी परिस्थिती नेहमीच निर्माण होते. या रस्त्यावर वाहतूक प्रचंड वाढली आहे. वाहतुकीच्या ताणामुळे रस्त्यांची कितीही डागडुजी केली तरी ते खराब होतातच. रस्त्याच्या या खराब अवस्थेचा फटका वाहन चालकांना बसतो.
नागपूरचे खासदार तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतीत पुढाकार घेतला. यासंदर्भातला प्रस्ताव राज्य शासनाकडून मंत्रालयाला पाठविण्यात आला होता. यानुसार गोळीबार चौकातील उड्डाण पूल आणि संविधान चौक ते रेल्वे स्टेशन ते भंडारा मार्ग ते रिंग रोड जंक्शन पर्यंतच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी २२८ कोटी २३ लाख ७३ हजार ८१३ इतक्या अंदाज पत्रिकेच्या किमतीच्या प्रस्तावास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासंदर्भातील पत्र नुकतेच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना प्राप्त झाले. (प्रतिनिधी)