नागपूर :गोंदियाचे पालकमंत्री म्हणून बाबासाहेब पाटील यांच्याऐवजी इंद्रनील नाईक यांची बुधवारी वर्णी लागली आणि दरवर्षी नवे पालकमंत्री नेमण्याची संतापजनक परंपरा कायम राहिली. या संगीतखूर्चीचा शेवट कधी होईल, याची या दोन्ही जिल्ह्यांना प्रतीक्षा आहे. या खेळामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाचा खेळखंडोबा झाला आहे.
गोंदिया जिल्ह्याला सन २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच पालकमंत्री लाभले होते. यात सुधीर मुनगंटीवार, धर्मरावबाबा आत्राम, नवाब मलिक, परिणय फुके, प्राजक्त तनपुरे आदी पाच पालकमंत्र्यांचा समावेश होता. जानेवारी २०२५ मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी नऊ महिन्यांतच हे पद सोडल्याने नवे पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्याचा अनुभवही असाच आहे. नव्या महायुती सरकारला अजून वर्ष पूर्ण झालेले नाही. परंतु या जिल्ह्यानेही दोन पालकमंत्री अनुभवले. २०१९ ते २०२५ दरम्यान जिल्ह्याने आठ पालकमंत्री पाहिले. डॉ. दीपक सावंत, सतेज पाटील, विश्वजीत कदम, सुनील केदार, देवेंद्र फडणवीस, डॉ. विजयकुमार गावित यांचा समावेश होता तर १९ जानेवारी २०२४ ते २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत डॉ. संजय सावकारे व आता डॉ. पंकज भोयर यांच्याकडे पालकत्वाची जबाबदारी आहे.
कोणत्याही जिल्हयाच्या विकासात पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने असा दरवर्षी खेळ सुरू असल्याने ही सावत्र वागणूक का दिली जात आहे, असा प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे. नुसतेच झेंडामंत्री नेमण्यापेक्षा स्थानिक नेतृत्व का दिले जात नाही, हा प्रश्नदेखील आहेच.
पाटील यांच्याऐवजी इंद्रनील नाईक गोंदियाचे पालकमंत्री
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रकृतीचे कारण पुढे करीत गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मंगळवारी (दि.१४) सोडले. पाटील यांच्या जागी उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाची धुरा देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांपूर्वीच बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्रिपद सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकांपूर्वीच भाकरी फिरविल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.
Web Summary : Gondia-Bhandara face development setbacks due to frequent guardian minister changes. Gondia had five ministers in five years, Bhandara eight. Locals question this instability, demanding local leadership over appointed officials for consistent progress.
Web Summary : गोंदिया-भंडारा में बार-बार पालक मंत्री बदलने से विकास बाधित हो रहा है। गोंदिया में पांच वर्षों में पांच मंत्री रहे, भंडारा में आठ। स्थानीय लोग इस अस्थिरता पर सवाल उठाते हैं, और लगातार प्रगति के लिए नियुक्त अधिकारियों के बजाय स्थानीय नेतृत्व की मांग करते हैं।