नवे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी पदभार स्वीकारत नागपूरला ‘बेस्ट ऑफ बेस्ट’ देण्याची ग्वाही
By आनंद डेकाटे | Updated: April 6, 2026 20:28 IST2026-04-06T20:27:37+5:302026-04-06T20:28:31+5:30
Nagpur : शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प, विकासकामे आणि लोकहिताच्या योजनांना आता नव्या गतीची अपेक्षा निर्माण झाली आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर स्पष्ट भूमिका मांडत, “प्राधान्यक्रम ठरवून कामे फास्ट ट्रॅकवर नेऊ.

New District Collector Kumar Ashirwad takes charge, promises to give Nagpur 'Best of Best'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प, विकासकामे आणि लोकहिताच्या योजनांना आता नव्या गतीची अपेक्षा निर्माण झाली आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर स्पष्ट भूमिका मांडत, “प्राधान्यक्रम ठरवून कामे फास्ट ट्रॅकवर नेऊ. नागपूरकरांना ‘बेस्ट ऑफ बेस्ट’ देण्याचा प्रयत्न राहील,” असे सांगितले.
मावळते जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आशिर्वाद म्हणाले की, नागपूर जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू असून विकासकामेही मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे वेळेत आणि वेगाने पूर्ण व्हावीत यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्राधान्यक्रम ठरवला जाईल. लोकहिताच्या योजनांना गती देतानाच जनसहभागालाही विशेष महत्त्व दिले जाईल.
गेल्या तीन वर्षांत सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून काम करताना पाणीटंचाई, दुष्काळसदृश्य परिस्थिती, पूर आणि संवेदनशील धार्मिक स्थळांशी संबंधित प्रश्न हाताळल्याचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. “नागपूरची भौगोलिक व सामाजिक रचना वेगळी आहे. पुढील दीड महिन्यात संपूर्ण जिल्ह्याचा सखोल अभ्यास करून कामांची दिशा निश्चित केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा जिल्हा असल्याने येथील लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून त्यांच्या मतदारसंघातील अडचणी जाणून घेतल्या जातील. शासनाच्या प्राधान्यानुसार आणि स्थानिक गरजांनुसार कामांना गती देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यापूर्वी गडचिरोलीत काम करताना दिव्यांग, कुपोषण आणि इतर सामाजिक योजनांवर प्रभावी काम केल्याची आठवण त्यांनी करून दिली. सोलापुरातही पाणीटंचाई आणि पुरपरिस्थितीच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. “नागपूर हा मोठा जिल्हा आहे. येथे विकासासोबत सामाजिक समतोल राखत काम करण्याची मोठी संधी आहे,” असे ते म्हणाले.
कुटुंबातही सनदी सेवेची परंपरा
मूळ झारखंडचे असलेले कुमार आशिर्वाद हे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचे पुत्र आहेत. २०१७ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे कुटुंब गेल्या २५ वर्षांपासून जमशेदपूर येथे स्थायिक आहे. बहिणीने कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली सुरू केली असून तिचे पतीही सनदी अधिकारी आहेत. धाकटा भाऊ २०२० च्या तुकडीतील भारतीय पोलीस सेवेत असून सध्या जमशेदपूर येथे कार्यरत आहे. कुमार आशिर्वाद हे आयआयटी खरगपूर येथून स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत.
गडचिरोली ते सोलापूर, आता नागपूर
यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक सिंधुदुर्ग येथे झाली. नंतर नाशिकमधील परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करून स्वतःच्या इच्छेनुसार त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नेमणूक मागितली होती. त्यानंतर सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी अनेक आव्हानात्मक परिस्थिती हाताळल्या. “गडचिरोली आणि सोलापूर हे दोन्ही जिल्हे मनात कायम राहतील. नागपूरबाबतही असेच घडावे यासाठी कामाची सुरुवात करीत आहे,” असे त्यांनी सांगितले.