झीनतने विणले यशाचे जाळे
By Admin | Updated: June 3, 2014 03:06 IST2014-06-03T03:06:27+5:302014-06-03T03:06:27+5:30
महापालिकेच्या शाळा म्हटले की शैक्षणिक गुणवत्ता खालावलेली असा समज आहे.

झीनतने विणले यशाचे जाळे
गणेश हुड नागपूर महापालिकेच्या शाळा म्हटले की शैक्षणिक गुणवत्ता खालावलेली असा समज आहे. मात्र, महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्या झीनत फातेमा या विद्यार्थिनीने हा समज दूर करून दाखविला आहे. व्यवसाय डबघाईस आलेल्या एका विणकराच्या या मुलीने यशाचे असे जाळे विणले आहे की, त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनाही आनंदाची शाल पांघरण्याची संधी मिळाली आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असतात. विपरीत परिस्थितीवर मात करून ते शिक्षण घेतात. अशाच गरिबीवर मात करीत साने गुरुजी उर्दू उच्च माध्यमिक शाळेच्या कला शाखेची विद्यार्थिनी झीनत फातेमा हिने ८0.७६ टक्के गुण मिळवून मनपाच्या शाळांमधून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. झीनतचे वडील विणकर आहेत. त्यांचा व्यवसाय डबघाईस आला आहे. परंतु उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने ते हा व्यवसाय करतात. महिन्याला कसेबसे दोन-अडीच हजार मिळतात. तिला तीन भाऊ अन् एक बहीण आहे. एक भाऊ ऑटो चालवितो. दोन बेरोजगार आहेत. घरची एकूणच परिस्थिती हलाखीची आहे. पण झीनतने वर्षभर ध्येय डोळ्यासमोर ठेवले. घरकामात आईला मदत करून दररोज सहा ते सात तास अभ्यास केला. आर्थिक परिस्थितीमुळे तिला कोणत्याही विषयाची ट्यूशन लावता आली नाही. मात्र, ती खचली नाही. शाळेतील शिक्षकांकडून अधिकाधिक बाबी समजून घेण्यासाठी तिने वेळ दिला. सातत्याने परिश्रम घेतले व शेवटी यशाचे शिखर गाठले.