नखांच्या इमेजवरून आजार शोधणारे अँप तयार करणारी नेहाने रचला इतिहास ! आयईईई येसिस्ट-१२ स्पर्धेत जगभरात पहिली
By निशांत वानखेडे | Updated: September 9, 2025 20:29 IST2025-09-09T20:27:21+5:302025-09-09T20:29:12+5:30
Nagpur : जगभरातील ९ देशांतील १८ तज्ज्ञ परीक्षक मंडळाने मूल्यांकन केले. त्यात नेहाचा प्रकल्प ठळक ठरला आणि जागतिक विजेतेपद पटकावले. नेहाच्या या अद्वितीय यशाबद्दल त्यांना १,००० अमेरिकन डॉलर्सचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

Neha creates history by creating an app that detects diseases from nail images! First in the world in IEEE Yesist-12 competition
नागपूर :नागपूरच्या तरुणीने जागतिक पातळीवर इतिहास रचला आहे. नेहा इंगाेले-साबळे यांनी नुकत्याच क्वालालंपूर (मलेशिया) येथे झालेल्या आयईईई येसिस्ट-१२ (युथ एन्डेव्हर्स फॉर सोशल इनोव्हेशन युजिंग सस्टेनेबल टेक्नॉलॉजी) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या स्पेशल ट्रॅक गटात जगभरातील स्पर्धकांना मागे टाकून पहिला क्रमांक पटकाविला आहे.
नेहा इंगाेले-साबळे या रामदेवबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागातील संशोधन विद्यार्थिनी आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा क्वालालंपूर येथे २४ ऑगस्ट २०२५ रोजी झाली. यंदा या स्पर्धेत ८ देशांतील ५०८ संघांनी आपले प्रकल्प सादर केले. प्रकल्पांमधून निवडलेल्या केवळ ३६ संघांना अंतिम फेरीत संधी मिळाली. जगभरातील ९ देशांतील १८ तज्ज्ञ परीक्षक मंडळाने मूल्यांकन केले. त्यात नेहाचा प्रकल्प ठळक ठरला आणि जागतिक विजेतेपद पटकावले. नेहाच्या या अद्वितीय यशाबद्दल त्यांना १,००० अमेरिकन डॉलर्सचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या संशोधन प्रवासात डॉ. रिचा खंडेलवाल यांनी मार्गदर्शन केले. नेहा या विद्यापीठात कार्यरत असलेल्या सुनील इंगोले यांच्या कन्या व एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत प्रताप साबळे यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे नागपूर, महाराष्ट्र आणि भारताचाही मान जगभर उंचावला आहे.
यकृताचे विकार शाेधण्यासाठी स्मार्टफोन ॲप्लिकेशन
नेहा आणि त्यांच्या टीमने सादर केलेला प्रकल्प ‘फिंगरनेल इमेजेसच्या सहाय्याने यकृत विकार व सोरायसिसचा लवकर शोध घेण्यासाठी स्मार्टफोन ॲप्लिकेशन’ हा होता. हा अभिनव प्रकल्प पूर्णतः नॉन-इन्व्हेसिव्ह, पोर्टेबल व परवडणारा असून ग्रामीण भागात आरोग्यसेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी क्रांतिकारक ठरणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ‘शाश्वत विकास उद्दिष्ट क्र. ३ – सर्वांसाठी चांगले आरोग्य व कल्याण’ याला हा प्रकल्प थेट हातभार लावतो.