नीरी संचालक राकेश कुमारांची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:14+5:302021-04-11T04:08:14+5:30
नागपूर : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) चे संचालक डाॅ. राकेश कुमार यांची त्यांच्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. ...

नीरी संचालक राकेश कुमारांची उचलबांगडी
नागपूर : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) चे संचालक डाॅ. राकेश कुमार यांची त्यांच्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. आलेल्या आदेशानुसार ‘नीरी’च्या संचालक पदाचे अधिकार काढून त्यांची वैज्ञानिक आणि औद्याेगिक संशाेधन परिषदेच्या दिल्ली येथील कार्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने डाॅ. कुमार यांना पदावरून हटविण्याबाबत नेमके कारण स्पष्ट केले नसले तरी ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आराेप परिषदेने गंभीरतेने घेतल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘नीरी’तील काही उच्चपदस्थांनी काेट्यवधीचा निधी बनावट कंपन्यांकडे वळविल्याची तक्रार संस्थेचे माजी काॅमन कॅडर अधिकारी संजय सुमन यांनी केली हाेती. केंद्रीय सतर्कता आयाेगाने या तक्रारींची दखल घेत चाैकशीसाठी सत्यशाेधन समिती स्थापन केली हाेती. तिचा अहवाल केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांच्याकडे सादर करण्यात आला. धक्कादायक म्हणजे या समितीच्या अहवालात ‘नीरी’च्या संचालकांसह अनेक शास्त्रज्ञांवरही ठपका ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नीरीमध्ये खळबळ उडाली आहे. सूत्रानुसार मंत्र्यांकडे राकेश कुमार यांना निष्कासित करण्याचीही शिफारस करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कुमार यांना हटविण्याचा आदेश यापूर्वीच नीरीमध्ये दाखल झाला हाेता. मात्र संस्थेचा स्थापना दिवस पार पडेपर्यंत थांबण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अखेर दुसऱ्याच दिवशी त्यांच्याकडील संचालक पदाचे सर्व अधिकार काढून त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आल्याचा आदेश परिषदेचे सहसचिव आर. वैधिस्वरन यांनी जारी केला. दरम्यान, पुढील सहा महिन्यांसाठी ‘नीरी’च्या संचालक पदाचा कारभार भारतीय रासायनिक तंत्रज्ञान संस्था, हैदराबादचे संचालक डाॅ. एस. चंद्रशेखरन यांच्याकडे साेपविण्याचा आदेश परिषदेने जारी केला आहे.