सर्वसामान्यांच्या ‘ईझ ऑफ लिव्हिंग’साठी प्रयत्नशील - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By आनंद डेकाटे | Updated: September 11, 2023 17:38 IST2023-09-11T17:29:29+5:302023-09-11T17:38:14+5:30
पूर्व नागपुरात ‘शासन आपल्या दारी अभियान

सर्वसामान्यांच्या ‘ईझ ऑफ लिव्हिंग’साठी प्रयत्नशील - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. शासनाचे सर्वच विभाग एका छताखाली आणून शिबिरे घेतल्यास लोकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचून दिलासा मिळतो. एखाद्या लाभार्थ्याला अनेक योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्यास फायदेशीर ठरते. सर्वसामान्यांच्या ‘ईझ ऑफ लिव्हिंग’साठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रात सोमवारी शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. टेकचंद सावकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, स्थानिक नगरसेवक यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले, सुमारे आठ लाख लाभार्थ्यांना या योजनेतून आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात लाभ मिळाला आहे. २५ लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाल्यानंतर शासन आपल्या दारी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. केंद्रात व राज्यात सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. केंद्राबरोबरच राज्य शासनाच्याही अनेक योजना आहेत. विकासकामांबरोबरच पट्टेवाटपाच्या कामांना अधिक गती देण्याची सुचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी नारायणसिंग ठाकूर, माया वानखेडे, मानवी गावंडे, पूर्णिमा बरडे आणि कांचन मोहरकर यांना प्रातिनिधीक स्वरुपात आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. विवाह नोंदणी, आधार कार्ड अद्ययावत करणे, ज्येष्ठ नागरिक कार्ड, राशन कार्ड, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र असे विविध विभागांचे ३४ स्टॅाल कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते.