आवश्यक ठिकाणी उपचाराची गुणवत्ता वाढविण्याची गरज

By Admin | Updated: July 25, 2015 03:12 IST2015-07-25T03:12:13+5:302015-07-25T03:12:13+5:30

सामान्यपणे आरोग्याशी निगडित परिषद देशातील मोठमोठ्या शहरात होतात. परंतु याची खरी गरज छोट्या शहरांना आहे.

The need to increase the quality of treatment in the required place | आवश्यक ठिकाणी उपचाराची गुणवत्ता वाढविण्याची गरज

आवश्यक ठिकाणी उपचाराची गुणवत्ता वाढविण्याची गरज

नागपूर : सामान्यपणे आरोग्याशी निगडित परिषद देशातील मोठमोठ्या शहरात होतात. परंतु याची खरी गरज छोट्या शहरांना आहे. आवश्यक ठिकाणी उपचाराची गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे. यालाच लक्षात ठेवून फाऊंडेशन आॅफ हेड-नेक आॅन्कोलॉजीने (एफएचएनओ) १५व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नागपुरात केले आहे.
डोके आणि मानेच्या कॅन्सरवर (हेड अ‍ॅण्ड नेक) आधारित ही परिषद सप्टेंबर महिन्यात होणार आहे. अशी माहिती, विदर्भ सोसायटी आॅफ हेड अ‍ॅण्ड नेक आँकोलॉजीचे अध्यक्ष व या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मदन कापरे यांनी ‘लोकमत’च्या विशेष चर्चेत दिली. डॉ. कापरे म्हणाले, या परिषदेचा केंद्रबिंदू रुग्ण आहे. पूर्वी दिल्ली, चेन्नई, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये अशा राष्ट्रीय परिषदा व्हायच्या. परंतु माझ्याकडे अध्यक्षाची जबाबदारी येताच जिथे गरज आहे, तिथे उपचाराची गुणवत्ता वाढविण्यावर जोर दिला. यामुळे पहिल्यांदाच विदर्भात एफएचएनओची राष्ट्रीय परिषद होत आहे. याचा फायदा मध्य भारतातील डॉक्टरांसोबतच कॅन्सरच्या रुग्णांनाही होणार आहे. या परिषदेतून नव ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.
यामुळे डॉक्टर अपडेट होतील. रुग्णांना मोठ्या शहरात उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही.
डॉ. कापरे म्हणाले, पाश्चात्त्य देशाच्या तुलनेत भारतात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. यात भारतात सर्वाधिक डोके आणि मानेचा कॅन्सरचे प्रमाण ३० टक्के आहे. त्यातल्या त्यात तोंडाचा कॅन्सरचे प्रमाणही ३० टक्के आहे.
युवा वर्गात या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहे. डोके आणि मानेच्या कॅन्सरकडे सुरुवातीच्या काळात अनेक रुग्ण दुर्लक्ष करतात. दुर्दैवाने सुरु वातीच्या काळात तोंडाच्या कॅन्सरमध्ये रु ग्णाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. यामुळे बहुतेक रु ग्ण कर्करोग अतिशय वाढलेल्या अवस्थेत डॉक्टरांकडे जातात.
त्यामुळे त्यांच्यावर उत्तम उपचार करूनसुद्धा क्वचितच रु ग्ण फार कमी वर्षे जगू शकतात. लवकर निदान व तत्काळ उपचार केल्यास त्यांची आयुर्र्मर्यादा वाढू शकते. या रोगावर शल्यचिकित्सा केल्यानंतर अर्थात काही भाग काढून टाकल्यानंतर त्यांना नीट खाता येत नाही. नीट बोलता येत नाही. दिसायला ते विद्रुप दिसू शकतात. सर्वात म्हणजे इतर कॅन्सरच्या तुलनेत हा कॅन्सर अत्यंत पीडादायी असतो. (प्रतिनिधी)

या विषयांवर होणार मागदर्शन
११, १२ व १३ सप्टेंबरला होणाऱ्या या राष्ट्रीय परिषदेला प्रा. डॉ. फ्रेड्रीको बिगलीओली हे ‘करंट कन्सेप्टस् इन फेशिअल रिअ‍ॅनिमेशन’ या विषयावर, प्रा. डॉ. चेरी अ‍ॅन नॅथन या ‘थायराईड कॅन्सर’ या विषयावर, प्रा. डॉ. राबर्टाे फुक्सेड्यू ‘लेझर इन हेड नेक कॅन्सर’ या विषयावर तर डॉ. मदन कापरे हे ‘इव्होल्यूशन इन आयसोलेशन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
रुग्णच खरे हिरो
डॉ. कापरे म्हणाले, कर्करोग हा जीवघेणा आणि अत्यंत पीडादायक आजार आहे. यात डॉक्टर केवळ आपल्या कौशल्याच्या बळावर उपचार करीत असतो. परंतु खरी लढाई रुग्ण लढत असतो. वेदना सहन करीत, या आजाराशी दोन हात करीत असतो. म्हणूनच आजारातून यशस्वीपणे बाहेर पडणारा रुग्णच ‘हिरो’ असतो. न्यूयॉर्कमध्ये डॉक्टरांसोबतच रुग्णांना महत्त्वाचे स्थान दिले जाते. त्याच धर्तीवर या परिषदेतही रुग्णांना महत्त्व दिले जाणार आहे.परिषदेचे उद्घाटनापूर्वी कॅन्सरची लढाई लढलेले रुग्ण स्वागत गीत सादर करतील तसेच काही रुग्णांना या परिषदेत आमंत्रित केले आहे. ते आपला संघर्ष मांडतील.
लाईव्ह सर्जरी
परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘थ्रीडी लाईव्ह सर्जरी’. निती क्लिनीकमध्ये डोके आणि मानेच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया केली जाईल. याचे थेट प्रक्षेपण परिषदेच्या आयोजन स्थळी होईल. अशाच प्रकारे सहा शस्त्रक्रियाचे संपादित व्हिडीओही दाखविले जातील. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपस्थित डॉक्टरांना अद्ययावत शल्यक्रियाची माहिती व मार्गदर्शन केले जाईल. विशेष म्हणजे यात नागपुरातील १६ डॉक्टरांचा सहभाग असणार आहे.
एफएचएनओची अशी झाली स्थापना
१५ वर्षांपूर्वी प्रा. डॉ. राममोहन तिवारी यांनी फाऊंडेशन आॅफ हेड अ‍ॅण्ड नेक आँकोलॉजीची (एफएचएनओ) स्थापना केली. ते मुळात छत्तीगड येथील राजनांदगाव येथील आहेत. नेदरलॅण्ड येथील अ‍ॅमस्टरडडॅम विद्यापीठाचे ते प्राध्यापक होते, तेथून परतल्यावर ‘हेड अ‍ॅण्ड नेक आँकोलॉजीला’पुढे आणण्यासाठी ६० डॉक्टरांनासोबत घेऊन या फाऊंडेशनची स्थापना केली. आता या फाऊंडेशनमध्ये केवळ या आजाराशी संबंधित पॅथालॉजीसह, रेडिओलॉजी, औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या डॉक्टरांपासून ते ईएनटीसह ९०० डॉक्टरांचा सहभाग आहे. या फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड निवडणुकीने होत नाही, तर त्यांना आमंत्रण देऊन केली जाते. विशेष म्हणजे, आतापर्यंत या फाऊंडेशनचे अध्यक्ष एम्स, टाटा, केईएम येथील वरिष्ठ डॉक्टर होते, परंतु पहिल्यांदाच हा मान डॉ. कापरे यांना मिळाला आहे.

Web Title: The need to increase the quality of treatment in the required place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.