खरा इतिहास शोधण्याची गरज
By Admin | Updated: January 20, 2015 01:19 IST2015-01-20T01:19:15+5:302015-01-20T01:19:15+5:30
भारताला बुद्ध संस्कृतीच्या रूपात वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. परंतु यापैकी बहुतांश इतिहास हा जाणीवपूर्व दडपण्यात आला असून भारताच्या वैभवशाली इतिहासाची माहिती करून घ्यायची

खरा इतिहास शोधण्याची गरज
रत्नावली प्रवचनमाला : धम्मचारी सुभूती यांचे प्रतिपादन
नागपूर : भारताला बुद्ध संस्कृतीच्या रूपात वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. परंतु यापैकी बहुतांश इतिहास हा जाणीवपूर्व दडपण्यात आला असून भारताच्या वैभवशाली इतिहासाची माहिती करून घ्यायची असेल तर भारताचा खरा इतिहास शोधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इंग्लंडचे रहिवासी असलेले त्रिरत्न बौद्ध महासंघाचे ज्येष्ठ धम्मचारी सुभूती यांनी आज येथे केले.
त्रिरत्न बुद्ध महासंघाच्या नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बुद्ध महोत्सवांतर्गत सोमवारी रत्नावली प्रवचनमालेस सुरुवात करण्यात आली. या प्रवचनमालेतील पहिले पुष्प गुंफतांना धम्मचारी सुभूती यांनी महान बौद्ध विद्वान असंग व वसुबंधू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. मैत्रीवीर नागार्जुन यांनी अनुवाद केला. नागकेतू यांनी भूमिका विषद केली.
धम्मचारी सुभूती म्हणाले, प्राचीन भारतात महान बौद्ध आचार्य असंग आणि वसुबंधू होऊन गेलेत. परंतु त्यांच्या जीवनाविषयी भारतीय इतिहासामध्ये फारसे लिहिल्याच गेले नाही. कारण इतिहास केवळ त्याच लोकांनी लिहिले जे जिंकले. बुद्धांची महान संस्कृती अशाच अनुल्लेखाने गाडल्या गेली. त्यामुळेच या दोन्ही महान आचार्यांबाबत आपल्याला फारशी माहिती नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये या महान आचार्यांसंबधी संदर्भ सापडतात. आचार्य असंग आणि वसुबंधू यांच्याबाबत जी काही माहिती आज उपलब्ध आहे, ती त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमुळे. परंतु ते मौलिक ग्रंथ भारतात नसून तिबेट आणि चीनमध्ये त्यांच्या भाषेत भाषांतरित करून जतन करून ठेवण्यात आले आहे. या दोन्ही देशात शेकडो वर्षांपासून हे ग्रंथ आजही सुरक्षित आहेत. भारत मात्र ही मौलिक ग्रंथसंपदा गमावून बसला आहे.
असंग आणि वसुबंधू हे चौथ्या शतकात गुप्त काळात होऊन गेलेले महान आचार्य आहेत. तेव्हा समुद्रगुप्त यांचे राज्य होते. समुद्रगुप्ताचे राज्य तेव्हा अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत पसरलेले होते. हे दोन्ही बंधू राजदरबारी होते. परंतु आपल्या मुलांनी बुद्धांच्या संघात सामील व्हावे, अशी तिची इच्छा होती. ती इच्छा तिने पूर्ण केली. दोन्ही बंधू बुद्धाच्या संघात सामील झाले.
अनेक वर्षे त्यांनी धम्माचा अभ्यास केला. परंतु केवळ अभ्यासच केला नाही, तर अनेक नवीन गोष्टी सुद्धा निर्माण केल्यात. पुढे हे दोन्ही बंधू आचार्य असंग आणि बसुबंधू हे महान तत्त्वज्ञ म्हणून जगात प्रसिद्ध झाले. त्यांच्या ग्रंथांचे तिबेटी व चीनी भाषेसह अनेक देशांनी आपापल्या भाषेत भाषांतर केले, ते ग्रंथ आजही त्यांनी जपून ठेवले आहेत. तिबेटमध्ये त्यांचे ग्रंथ हे अतिशय पवित्र मानले जातात. परंतु भारतातील या महान आचार्यांबाबत भारतीयांनाच माहिती नाही, ही शोकांतिकाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)