गरज २५० शौचालयांची अन् आहेत फक्त १२५! स्मार्ट उपराजधानीचे वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 21:29 IST2021-09-29T21:27:52+5:302021-09-29T21:29:05+5:30
Nagpur News नागपूर शहराची लोकसंख्या विचारात घेता, २५० सार्वजनिक शौचालयांची गरज असताना आज फक्त १२५ शौचालये आहेत.

गरज २५० शौचालयांची अन् आहेत फक्त १२५! स्मार्ट उपराजधानीचे वास्तव
नागपूर : भाजपची सत्ता असल्यापासून मागील १५ वर्षांत महिलांसाठी सुविधा व योजनांसदर्भात इतक्या घोषणा झाल्या की, आज सत्ताधाऱ्यांनाही त्या आठवत नाहीत. असाच महिलांसाठीच्या शौचालयाचा विसर पडला आहे. शहराची लोकसंख्या विचारात घेता, २५० सार्वजनिक शौचालयांची गरज असताना आज फक्त १२५ शौचालये आहेत.
शहराची लोकसंख्या ३० लाखांहून अधिक आहे. ७५ मोठे बाजार आहेत. ३८ प्रभागांत विभागणी असलेल्या नागपुरात १५१ वॉर्ड आहेत. ४२६ झोपडपट्ट्या आहेत. यात ८ लाखांहून अधिक लोक वास्तव्यास आहेत. त्यात शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. याचा विचार करता, शहरात २०० ते २५० सार्वजनिक शौचालयांची गरज आहे. सध्या १२५ सार्वजनिक शौचालये आहेत. यात बाजारात सशुल्क ६५ सार्वजनिक शौचालये आहेत. झोपडपट्टी भागात ६० नि:शुल्क सार्वजनिक शौचालये आहेत. शहरात १०० सुलभ शौचालय व महिलांसाठी शौचालय उभारण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु सत्ताधाऱ्यांना याचा विसर पडला आहे. माजी महापौर संदीप जोशी यांनी ३१ जानेवारीपूर्वी ३२ सार्वजनिक शौचालये उभारण्याची घोषणा केली होती; परंतु कोरोना संकट आले. विद्यमान महापौरांना या घोषणेचा विसर पडला.
बाजारात महिलांसाठी सुविधा नाही
शहरात स्थायी व अस्थायी ७५ बाजार आहेत. अधिकृत बाजारात पे अँड यूज शौचालये आहेत. दिवसभरात बाजारात लाखो लोक येतात. मागील काही वर्षांत बाजारांचा विस्तार व संख्या वाढली; परंतु शौचालयांची संख्या जुनीच आहे. गैरसोयीमुळे नागरिक त्रस्त आहेत. महिलांची कुुचंबणा होते. विविध आजारांना सामोरे जावे लागते. सीताबर्डीत दोन सार्वजनिक शौचालये आहे; परंतु महिलासांठी सुविधा नाही. महाल बाजारात लांब अंतरावर शौचालय आहे. सक्करदरा, गांधीबाग, सदर या बाजारांत सुविधा आहे, परंतु ती पुरेशी नाही.
शौचालयांत स्वच्छतेचा अभाव
स्लम भागातील घरात शौचालयासाठी जागा नाही. अशा दाट वस्त्यांत सार्वजनिक शौचालये आहेत; परंतु या शौचालयांची देखभाल व दुरुस्ती होत नाही. काही ठिकाणी दारे तुटली आहे, तर कुठे पाण्याची व्यवस्था नाही. शहरात ४२६ झोपडपट्ट्या असताना या भागात ६० सार्वजनिक शौचालये आहेत.