शिवसेनेला राष्ट्रवादीचा झटका; ४० कार्यकर्त्यांनी शिवबंधन सोडून हाती बांधले घड्याळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 17:26 IST2021-10-10T15:39:49+5:302021-10-10T17:26:04+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेनेच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश सुरुच आहेत. शनिवारी नागपुरातील नंदनवन येथे आयोजित एका मेळाव्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक व अनेक कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शिवसेनेला राष्ट्रवादीचा झटका; ४० कार्यकर्त्यांनी शिवबंधन सोडून हाती बांधले घड्याळ
नागपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला हादरे देण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी शिवसेनेतील जवळपास ४० कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेले शेखर सावरबांधे यांचे हे समर्थक आहेत.
नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली असून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कमान हातात घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काल शनिवारी नंदनवन येथे अक्षय मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात अनेक कार्यकर्त्यांनी पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या माजी नगरसेविका जयश्री जांभुळे, महिला उपजिल्हा संघटिका नीलम उमाठे, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक शशिकांत ठाकरे, शहर समन्वयक तुषार कोल्हे आदींचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. सावरबांधे यांनी त्यानंतर आपली कामाची गती वाढवत त्यांचे शिवसेनेतील समर्थक असलेले कार्यकर्ते आणि काही माजी नगरसेवक यांना आपल्याकडे ओढण्यात यश मिळविले. सावरबांधे यांच्या पाठोपाठ ४० कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हादरे बसू लागले असून शिवसेना बॅकफूटवर जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात पेव फुटू लागले आहे.