काटोलमध्ये राष्ट्रवादी, भाजपात होणार टक्कर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:09 IST2020-12-24T04:09:45+5:302020-12-24T04:09:45+5:30
काटोल : काटोल तालुक्यातील खंडाळा खु.,भोरगड व माळेगाव या तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात तिन्ही ...

काटोलमध्ये राष्ट्रवादी, भाजपात होणार टक्कर?
काटोल : काटोल तालुक्यातील खंडाळा खु.,भोरगड व माळेगाव या तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात तिन्ही ग्रा.पं.साठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात सामना होईल. काटोल तालुक्यातील मतदारांचा गत पाच वर्षांचा कौल लक्षात घेता विधानसभा, लोकसभा आणि नगरपरिषदेसाठी तीन वेगवेगळ्या पक्षांना येथे पसंती देण्यात आल्याचे निकालावरून स्पष्ट होते. त्यामुळे ग्रा.पं.च्या निवडणुकीत स्थानिक मुद्यांना अधिक प्राधान्य असल्याचे दिसून येत आहे. या तीन ग्रामपंचायतींसाठी ३,४२४ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. तालुक्यातील खंडाळा खु.व भोरगड या दोन ग्रामपंचायती पारडसिंगा जिल्हा परिषद सर्कलमध्ये मोडतात. जि.प.निवडणुकीत येथे राष्ट्रवादीचे चंद्रशेखर कोल्हे यांनी भाजपचे संदीप सरोदे यांचा पराभव केला होता. यावेळी या दोघांनीही ग्रा.पं.ची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. येनवा सर्कलमधील माळेगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीचा गड असली तरी यावेळी येथे परिवर्तन करण्याचा संकल्प स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचे दिसून येत आहे. मात्र येथे शेकापचा पाठिंबा विजयासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.