आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
By आनंद डेकाटे | Updated: October 16, 2025 14:53 IST2025-10-16T14:48:17+5:302025-10-16T14:53:51+5:30
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले : रिपब्लिकन पक्षात येण्याची दिली ऑफर

Naxalites who surrender should enter politics and contest elections
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवले. हिंसेचा मार्ग सोडून संविधानाचा मार्ग अवलंबिला. मुख्य प्रवाहात सहभागी झाले. त्या सर्व नक्षलवाद्यांचे आम्ही स्वागत करतो.ते मुख्य प्रवाहात आलेच आहेत. तर त्यांनी राजकारणातही यावे, निवडणूक लढवावी, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरूवारी व्यक्त केले. ते नागपुरात पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना रिपब्लिकन पक्षात येण्याची ऑफरही देऊ केली.
गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून हिंसेचा मार्ग सोडला. मुख्यमंत्र्यांनी त्या सर्वांना संविधानाची प्रत देऊन त्यांना मुख्य प्रवाहात सामिल करून घेतले. या घटनेसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, नक्षलवाद्यांचा त्यागाबाबत आम्हाला सहानुभूती आहे. अनेक उच्च शिक्षित लोकं यात आले. परंतु त्यांनी जो हिंसेचा मार्ग स्वीकारला तो मान्य नाही. नक्षलवाद्यांना आता हिंसेचा मार्ग योग्य नसल्याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे ज्या नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले त्या सर्वांचे मी स्वागत करतो आणि ज्यांनी अजुनही हिसेंचा मार्ग सोडलेला नाही त्यांनीही शस्त्र खाली ठेवून संविधानाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही केले.
रिपाइंचे अनेक गट असले तरी देशभरात केवळ आमचाच रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे. दोन राज्यात आमचे आमदार आहेत. आणखी दोन राज्यात आमदार आले तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. पुढच्या वर्षी आमचा तसा प्रयत्न राहील. याच दृष्टीने पुढच्या वर्षी ८ मार्च रोजी नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर रिपाइंचे राष्ट्रीय संमेलन भरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला पूरणचंद्र मेश्राम, राजन वाघमारे, बाळू घरडे, विनोद थूल उपस्थित होते.
बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
बिहारच्या निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असे पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च जाहीर केले होते. त्यामुळे नितीश कुमार हेच एनडीएचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. मतचोरीचा आरोप करणाऱ्या इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत मतचोरी झाले का? असा प्रश्नही उपस्थित केला. मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांना थोडा फायदा होईल, पण मुंबईत सरशी महायुतीचीच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.