आंबेडकर जयंतीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी उघडपणे माफी मागावी

By योगेश पांडे | Updated: April 10, 2025 18:45 IST2025-04-10T18:44:24+5:302025-04-10T18:45:26+5:30

जनसंघर्ष समितीची मागणी : केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहीले पत्र

Naxalites should publicly apologize on Ambedkar Jayanti | आंबेडकर जयंतीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी उघडपणे माफी मागावी

Naxalites should publicly apologize on Ambedkar Jayanti

योगेश पांडे  - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
गृहमंत्री अमित शाह यांच्या आवाहनानंतर नक्षलवादी संघटनांनी शांतता चर्चेसाठी तयारी दाखविली आहे. मात्र या संघटनांशी काही अटींवरच चर्चा करावी अशी भूमिका नक्षलवादी क्षेत्रात काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीने घेतली आहे. १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी उघडपणे माफी मागावी तसेच शहरांतील व्हाईट कॉलर सहकाऱ्यांची नावे जाहीर करावीत अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री शाह यांना पत्रदेखील पाठविले आहे.

नक्षलवाद्यांनी आतापर्यंत हजारो निष्पाप आदिवासी व नागरिकांना क्रूरपणे मारले आहे. त्यांनी सरकारसमोर शांतता चर्चेची विनंती केली आहे ही चांगली बाब आहे. मात्र त्याअगोदर काही अटींचे त्यांना पालन करायला लावणे अनिवार्य आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, सीपीआय (माओवादी) पक्षाच्या भूमिगत नेत्यांनी उघडपणे समोर येऊन हजारो निष्पाप आदिवासी आणि दलितांच्या हत्येबद्दल जाहीरपणे माफी मागावी. तसेच भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी जाहीर करावे. माओवादी चळवळीतील नेते मुख्य प्रवाहातील संवैधानिक प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक आहे हे त्यांनी जनतेला सांगावे. त्यांनी सीपीआय (माओवादी) पक्ष विसर्जित करावा व सर्व शस्त्रे तसेच दारुगोळा पोलिसांच्या हवाली करावा. माओवादी पक्षाच्या सरचिटणीसांपासून ते पीएलजीएच्या शेवटच्या नक्षलवाद्यापर्यंत सर्वांनीच सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण करावे अशी अट टाकण्यात यावी. तसेच माओवाद्यांनी त्यांच्या शहरी आघाडीच्या संघटना आणि कार्यकर्त्यांची नावे उघडपणे जाहीर करावीत. त्यांच्याशी निगडीत शहरी संघटना बरखास्त कराव्या ही महत्त्वाची अट त्यांच्यासमोर टाकायला हवी, अशी पत्रातून जनसंघर्ष समितीने गृहमंत्र्यांकडे मागणी केल्याची माहिती अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी दिली आहे.

Web Title: Naxalites should publicly apologize on Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.