नक्षली हल्ल्यात ७ जवान शहीद

By Admin | Updated: May 12, 2014 00:27 IST2014-05-12T00:27:50+5:302014-05-12T00:27:50+5:30

दोन दिवस चामोर्शी तालुक्यातील येडानूर जंगल परिसरात नक्षलविरोधी शोध मोहीम राबवून रविवारी सकाळी परतीसाठी निघालेल्या आठ सुमो गाड्यांच्या काफिल्यातील एका वाहनाला ...

Naxal attack: 7 jawans martyrs | नक्षली हल्ल्यात ७ जवान शहीद

नक्षली हल्ल्यात ७ जवान शहीद

मोहिमेवरून परतताना घडली घटना : दोन जवान जखमी

गडचिरोली : दोन दिवस चामोर्शी तालुक्यातील येडानूर जंगल परिसरात नक्षलविरोधी शोध मोहीम राबवून रविवारी सकाळी परतीसाठी निघालेल्या आठ सुमो गाड्यांच्या काफिल्यातील एका वाहनाला नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटात उडविल्याने सात पोलीस जवान जागीच शहीद झाले तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. सदर घटना रविवारी सकाळी १० वाजता मुरमुरी ते जोगना या गावादरम्यान पोर नदीच्या पुलावर घडली. चामोर्शी तालुक्याच्या पावीमुरांडा, येडानूर जंगल परिसरात नक्षलवाद्यांच्या शोध मोहिमेसाठी दोन दिवसांपासून पोलिसांचे विशेष आॅपरेशन सुरू होते. या आॅपरेशनसाठी गडचिरोली पोलीस दलातील सी-६० पथकाच्या पार्ट्या गडचिरोली पोलीस मुख्यालयातून रवाना करण्यात आल्या होत्या. या पार्ट्यांना मुरमुरीपर्यंत वाहनाने सोडून देण्यात आले होते. दोन दिवस जंगल परिसरात शोध मोहीम राबवून रविवारी परतीसाठी पार्ट्या निघाल्या होत्या. या मोहिमेवर असलेल्या सर्व जवानांना पिकअप करण्यासाठी आठ वाहनांचा काफिला तयार ठेवण्यात आला होता. ज्या ठिकाणाहून आॅपरेशनसाठी वाहनातून सोडण्यात आले होते, तेथूनच जवानांना परत नेताना वाहनात घेतले जाणार आहे. याची कुणकुण नक्षलवाद्यांना लागली. पार्ट्या येणार असलेल्या मार्गावर जोगना ते मुरमुरीदरम्यान पोर नदीच्या पुलालगत नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवली होती. पोर नदीलगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळून पुलापर्यंत भूमिगत वायरिंग पसरविली होती. पोलीस जवानांच्या वाहनांचा काफिला येताच सुरूवातीचे दोन वाहने सुरळीत निघून गेले. त्यानंतरच्या तिसर्‍या वाहनाला (एमएच ३३ पी-१४६) नक्षलवाद्यांनी लक्ष्य करीत भूसुरूंग स्फोट घडवून आणला. स्फोट इतका भीषण होता की, घटनास्थळावर पाच फुटाचा खोल खड्डा पडला. तसेच वाहन १० ते १५ फूट उंच जाऊन कोसळले. यात वाहन पूर्णत: क्षतिग्रस्त झाले. वाहनाचे अवशेष जमा करून ते ट्रकद्वारे आणावे लागले. या भीषण स्फोटात शिपाई सुनील तुकडू मडावी रा. दुर्गापूर (जि. चंद्रपूर), रोशन हनुमंत डंबारे रा. चामोर्शी (जि. गडचिरोली), सुभाष राजेश कुमरे रा. जारावंडी ता. एटापल्ली, दुर्योधन मारोती नाकतोडे रा. कुरूड ता. देसाईगंज, तिरूपत्ती गंगय्या अल्लम रा. चिट्टूर (अंकिसा) ता. सिरोंचा, पोलीस नायक दीपक रतन विघावे रा. श्रीरामपूर (जि. अहमदनगर), वाहन चालक लक्ष्मण पुंडलिक मुंडे रा. अंतरवेली ता. गंगाखेड (जि. परभणी) हे घटनास्थळीच ठार झाले. या घटनेत पंकज शंकर सिडाम रा. जारावंडी ता. एटापल्ली, हेमंत मोहन बन्सोड रा. पोटगाव (विहीरगाव) ता. देसाईगंज जि. गडचिरोली हे जखमी झाले आहेत. दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हेलिकॉप्टरने हलविण्यात आले आहे. भूसुरूंग स्फोटाच्या घटनेपूर्वी ६ मे रोजी याच भागात खासगी बांधकाम कंत्राटदाराचे एक टँकर नक्षलवाद्यांनी जाळले होते. सदर घटनास्थळ गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून केवळ ३० किमी अंतरावर आहे. घटनेनंतर परिसरातील गावातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. पोलीस पथकाने संपूर्ण घटनास्थळावर नाकेबंदी करून पंचनामा केला. भूसुरूंग स्फोटामुळे रस्त्यावर पडलेला खड्डा तत्काळ बुजविण्यात आला. या घटनेत शहीद झालेल्या सात पोलीस जवानांचे शव दुपारी १२.४५ वाजता जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे आणण्यात आले होते. यावेळी रूग्णालय परिसरातही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष अभियानासाठी गेलेल्या पोलीस पथकातील इतर पोलीस जवानांचा रूग्णालय परिसरात आक्रोश होता. आपले सहकारी गमाविल्याचे दु:ख त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल खाडे, गडचिरोलीचे ठाणेदार उमेश बेसरकर आदी उपस्थित होते. त्यानंतर या शहीद जवानांवर रूग्णालयात शवविच्छेदन सुरू होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Naxal attack: 7 jawans martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.