शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीच्या नवदुर्गा : रणरागिणीच नव्हेत, वनरक्षणासाठी धडपडणाऱ्या ‘त्या’ तर ‘वाघिणी’च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 12:18 IST

धाडस, साहस आणि शौर्याची प्रचिती : पुरुषी वर्चस्वाला छेद देत चोखाळताहेत नवी वाट

नागपूर : निसर्गाच्या विविध रूपांपैकी एक नितांतसुंदर रूप म्हणजे जंगल. हजारो पक्षी, प्राणी, पशूंचे निवासस्थान असलेल्या या जंगलाचे आकर्षण अनेकांना असते. या आकर्षणापोटी जंगलातील प्राण्यांची शिकार आणि वनसंपदेची नासधूसही सुरू झाली आहे. जंगलाचे हे वैभव टिकविण्यासाठी वनविभागाचा पहारा असला तरी अनेकदा संघर्षाचेही प्रकार घडले आहेत.

रक्षण हे क्षेत्र तसे पुरुषांचे मानले गेले आहे. मात्र, या धाडशी क्षेत्रात आता मोठ्या संख्याने महिलाही आल्या आहेत. अंगावर गणवेश चढवून आणि हातात शस्त्र घेऊन या वनबाला वनांच्या रक्षणासाठी सरसावल्या आहेत. प्रसंगी रात्री-बेरात्री जंगलात गस्त घालत, तस्करांशी मुकाबला करत आणि वन व वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी सरसावलेल्या आहेत. या महिलांमध्ये असलेल्या शक्तीचा प्रत्यय अनेकदा आला आहे. जंगलाच्या संरक्षणाचे काम पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वन विभागातील वाघिणी करीत आहेत. या नवरात्र उत्सवात जंगल, वन्यप्राण्यांच्या संरक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रणरागिणींचा परिचय नवरात्रीच्या पर्वावर ‘लोकमत’ वाचकांना करून देत आहे...

हातात काठी घेऊन प्रिया तागडे जंगलात घालतात पायदळ गस्त

प्रिया जयंत तागडे या हिंगणा रेंजमध्ये कवडस बीटमध्ये वनरक्षक पदावर कार्यरत आहेत. वन विभागात त्यांची १० वर्षांची सेवा पूर्ण झाली आहे. यातील ८ वर्षे त्या पेंच अभयारण्यात कार्यरत होत्या. तेथील कोअर, बफर क्षेत्रात हातात काठी घेऊन पायदळ जंगलात गस्त घालून वन्यप्राण्यांचे रक्षण करण्याचे काम त्यांनी केले आहे. भल्याभल्यांनाही भीतीने घाम फुटावा अशा परिस्थितीत हिमतीने जंगलात पायी फिरणाऱ्या प्रिया यांचे सर्वांनाच कौतुक आहे. जंगलातील अवैध वृक्षतोड, पेंच नदीवरील मासेमारांचा बंदोबस्त करण्याची महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. यापुढेही जंगल रक्षणासाठी सदैव सतर्क राहून वन्यप्राण्यांची आणि जंगलाची सुरक्षा करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

वन्यप्राण्यांच्या शिकारी रोखण्यासाठी वर्षा जगताप यांची धडपड

वर्षा जगताप या देवलापार रेंजमध्ये स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्समध्ये मागील तीन वर्षांपासून कर्तव्य बजावत आहेत. हातात काठी घेऊन सहकारी महिलांसोबत त्या जंगलात गस्त घालतात. वाघांचे संरक्षण करणे, जंगली प्राण्यांच्या शिकारीवर अंकुश लावण्याचे महत्त्वाची जबाबदारी त्या बजावत आहेत. हे काम धाडसाचे आहे. शिकारी टोय्यांसोबत मुकाबला करावा लागतो. जंगलात तर अधिकच धोका असतो. याशिवाय मासेमारांचा बंदोबस्त करण्याचे काम त्या करतात. जंगलात गस्त घालताना जिवाचा धोका असतो. सापळे लावलेले असतात. मात्र ते सवड मोडून काढत त्यांची अहर्निश सेवा सुरू असते. गेल्या तीन वर्षांपासून स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्समध्ये त्या देत असलेली सेवा म्हणजे कौतुकाचा विषय आहे.

ज्योती राऊत करतात पर्यटकांना मार्गदर्शन अन् जंगलांचे रक्षण

ज्योती प्रवीण राऊत या गेल्या दोन वर्षांपासून वन विभागात सेवा देत आहेत. त्या सालेघाट रेंजमध्ये खुबाळा गेटवर कर्तव्य बजावतात. जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांची नावे नोंदवून त्यांचे वाहन आत सोडणे, त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम त्या करीत आहेत. यासोबतच जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. जंगलात वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये, अवैध वृक्षतोड होऊ नये यासाठी त्या गस्त घालून जंगलाचे संरक्षण करतात. वेळप्रसंगी रात्री बेरात्री जंगलात जाऊन त्यांना कर्तव्य बजवावे लागते. जंगलाचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य असून यापुढेही इमानदारीने हे काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. कल्पना होमकर याचे स्वप्न उतरले कृतीत

अगदी लहानपणापासून ‘त्यांना’ जंगलाची आणि निसर्गाची आवड होती. जंगल, पाने-फुले, पक्षी निरखत त्यांचा दिवस उजाडायचा अन् मावळायचा. लहानपणापासूनच जंगल आणि निसर्गाबद्दलचे प्रेम मनात घट्ट बसले. पुढे उच्चशिक्षण घेताना दृढ संकल्प झाला, वनविभागातच काम करण्याचा ! अनेक स्पर्धा परीक्षा देऊन आणि त्या उत्तीर्ण करूनही ‘त्यांनी’ वन विभागातील सेवेच्या दिशेने प्रवास सुरू केला. अखेर एफडीसीएममध्ये एसीएफ पदापर्यंत पोहोचून त्यांनी स्वप्न साकार केले. डाॅ. कल्पना होमकर-चिंचखेडे असे त्यांचे नाव. २०१४ पासून त्या वनसेवेत आहेत. अलीकडेच त्यांनी पक्ष्यांच्या विषयावर अध्ययन करून डॉक्टरेटही मिळविली. सध्या त्या एफडीसीएममध्ये एसीएफ सहायक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. गोरेवाडा प्रकल्पात काम करताना प्राणी-पक्ष्यांवर जवळून अभ्यास केला. त्या म्हणतात, ‘या क्षेत्रात काम करताना समर्पणाची गरज आहे. सुदैवाने अलीकडे असे वन अधिकारी वन विभागाला लाभत आहेत.

वाघांच्या संरक्षणासोबत गावांचाही विकास करतात पूनम खंदारे

पूनम खंदारे या गेल्या तीन वर्षांपासून पेंच व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलात वनरक्षक पदावर कार्यरत आहेत. जंगलातील शिकारींना प्रतिबंध घालणे, गावकऱ्यांमध्ये वन्यप्राण्यांविषयी असलेले गैरसमज दूर करणे, जंगलातील अतिक्रमण हटविण्याचे काम त्या करतात. जीवाची पर्वा न करता जंगल आणि वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी त्या जंगलात गस्त घालत असतात. यासोबतच गावांमध्ये विकासाच्या योजना राबविण्याचे महत्त्वाचे कामही त्या करतात. गस्त घालताना एकदा उमरेड-कऱ्हांडलामध्ये अचानक त्यांच्यासमोर ४ वर्ष वयाचा वाघ आला. परंतु, न घाबरता त्यांनी वरिष्ठांना सूचना देऊन त्या वाघाला जंगलात पोहोचविले. जंगलाच्या रक्षणासाठी अविरत सेवा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

पुष्पा पाठराबे करतात धोकादायक प्राण्यांचे संगोपन

अनेकदा बिबट्या, वाघांची पिले माणसांसाठी धोकादायक ठरतात. या प्राण्यांचा अपघात होतो. ते आजारीही पडतात, त्यामुळे त्यांना गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात येते. या मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या प्राण्यांचे संगोपन करून त्यांची देखरेख करण्याचे काम तसे मोठे जोखमीचेच; पण पुष्पा चंद्रशेखर पाठराबे हे काम लिलया करतात. त्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये वनरक्षक पदावर कार्यरत आहेत. १४ वर्षांच्या सेवेत त्यांनी जंगलाचे रक्षण करताना अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे. अनेकदा रेस्क्यू सेंटरमध्ये असलेल्या बिबट्यांना भेटण्यासाठी जंगलातील बिबट्या येतात. एकदा गस्त घालत असताना अचानक झाडीत एक बिबट्या बसून असलेला दिसला. प्रसंग मोठा धोक्याचा होता; परंतु त्या डगमगल्या नाहीत. थोड्या वेळानंतर तो बिबट्या निघून गेला. या कामात जोखीम असली तरी असे चॅलेंजिंग काम करण्याची आवड असल्याने यात आनंद असल्याचे त्या म्हणतात.

वाघाच्या शिकाऱ्यांना सुनीता नागरगोजेंनी केले गजाआड

सुनीता नागरगोजे या बुटीबोरी रेंजमध्ये वनरक्षक पदावर कार्यरत आहेत. मागील १० वर्षांपासून त्या वन विभागात आपली सेवा देत आहेत. यापैकी ८ वर्षे त्या पेंच अभयारण्यात कर्तव्य बजावत होत्या. २०१६-१७ मध्ये त्यांनी तीन वाघांची शिकार करणाऱ्या आरोपींना वरिष्ठ आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पकडून गजाआड केले. वाघ, जंगल ही देशाची संपत्ती आहे. त्यांचे रक्षण करणे म्हणजे देशाच्या संपत्तीचे रक्षण करणे असे त्या मानतात. रात्री-अपरात्री जंगलात जाऊन गस्त घालतानाही त्या घाबरत नाहीत. बुटीबोरी रेंजमध्येही त्यांनी वाघाची शिकार करणाऱ्या आरोपींना पकडले आहे. त्यामुळे त्यांचे वन विभागात कौतुक आहे. जंगलात कर्तव्य बजावताना चार वर्षांपूर्वी पेंच अभयारण्यात सायंकाळी ६.३० वाजता अचानक त्यांच्या स्कूटीसमोर वाघ आला. न डगमगता प्रसंगावधान राखले. त्या एका जागी थांबल्या. वाघ रस्त्याच्या बाजूला बसल्यानंतर त्या तेथून निघून गेल्याचा त्यांचा अनुभव मोठा विलक्षण आहे.

जंगलात वाघाशी झाला होता वैशाली बशिनेंचा सामना

वैशाली बशिने या मागील ११ वर्षांपासून वन विभागात वनरक्षक म्हणून वन संरक्षणाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. जंगल म्हटल्यावर वन्यजीव, श्वापदांसोबत सामना होणारच. असाच प्रसंग पाच महिन्यांपूर्वी घडला. जंगलात गस्त घालत असताना अवघ्या ५० मीटरवर वाघ उभा होता. मात्र, जंगल आणि वन्यजीवांच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेल्यांनी घाबरून कसे चालणार? न डगमगता त्यांनी प्रसंगावधान राखले, काही वेळाने वाघ तेथून निघून गेला. प्रतिकूल परिस्थितीत काम करत जंगलाचे संरक्षण करणे, अवैध वृक्षतोडीला आळा घालणे, वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये तसेच वणवा लागू नये, यासाठी गस्त घालणे, जंगल परिसरात अतिक्रमण होऊ नये आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी त्या अहोरात्र परिश्रम घेतात. प्रसंगी रात्री-अपरात्री जंगलात जाऊन वन्यप्राण्यांच्या आणि जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वैशाली बशिने यांच्या धाडसाचे कौतुकच आहे.

रात्री १२ वाजता विहिरीत पडलेल्या बिबट्याला मीनाक्षी गोनमारे यांनी दिले जीवदान

जंगलात गस्त घालताना कधी कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल, याचा काही नेम नसतो. हिंगणा वन परिक्षेत्रात अडेगाव बीटमध्ये वनरक्षक पदावर काम करणाऱ्या मीनाक्षी मन्साराम गोनमारे यांचा अनुभव काहीसा असाच आहे. रामटेक वनपरिक्षेत्रात एकदा रात्री १२ वाजता कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला होता. वरिष्ठांकडून सूचना मिळताच त्या आपल्या पथकासह पोहोचल्या. रात्रभर दक्षता घेऊन बिबट्यावर पाळत ठेवली. पहाटे ५ वाजता बिबट्याला बाहेर काढल्यावरच त्या घरी परतल्या. मागील ११ वर्षांपासून त्या वन विभागात अशी जोखमीची सेवा देत आहेत. रस्त्यावर अपघातात वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्यास रात्री-अपरात्री जाऊन पंचनामा करावा लागतो. मानव वन्यजीव संघर्षात तर बरीच कसरत होते. मात्र, या कामातही मोठा आनंद असल्याचे त्या मानतात. वन्य प्राणी आणि जंगल ही निसर्गाची देणगी आहे. त्यांचे रक्षण आम्ही नाही करायचे तर कोणी करायचे, असे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :WomenमहिलाNavratriनवरात्रीSocialसामाजिकnagpurनागपूर