निसर्गाला अनुकूल ‘लिटिल वूड’
By Admin | Updated: June 5, 2017 01:57 IST2017-06-05T01:57:14+5:302017-06-05T01:57:14+5:30
महामेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत निसर्गाला अनुकूल रचनात्मक कार्य करण्यात येत आहेत.

निसर्गाला अनुकूल ‘लिटिल वूड’
मेट्रो रेल्वेतर्फे २४ हेक्टरवर वृक्षारोपण :जागतिक पर्यावरण दिनी कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत निसर्गाला अनुकूल रचनात्मक कार्य करण्यात येत आहेत. त्यानुसार महामेट्रोने लिटील वूड प्रकल्पाची सुरुवात करताना एक वर्षांपूर्वी टी-पार्इंटजवळील अंबाझरी तलावाच्या काठावर वन विभागाच्या जागेवर ५५०० झाडे लावली आहेत. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी रविवारी सकाळी वृक्षांची पाहणी केली.
वन विभागाच्या जागेवर विविध प्रजातीची जवळपास ५५०० झाडे लावली आहेत. ज्या वृक्षांची वाढ होणार नाही, त्या ठिकाणी दुसरे वृक्ष लावण्यात येत आहेत. या वन क्षेत्रात आता पक्ष्यांचा वावर आहे. प्रकल्पासाठी कापण्यात आलेल्या वृक्षांच्या तुलनेत पर्यावरणाला अनुकूल करण्यासाठी महामेट्रोने वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे. लोकवस्तीत वास्तविक वन साकार करण्याचा संकल्प केला आहे.
जागतिक पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर लिटिल वूड येथे रविवारी आयोजित समारंभात दीक्षित यांनी विचार व्यक्त केले. २४ हेक्टर जागेवर वनक्षेत्र तयार होत आहे. नैसर्गिक वातावरण नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे. या क्षेत्रात वास्तविक कलेवर भर दिला आहे. याशिवाय वॉकिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक राहणार आहे.
त्याचा फायदा सकाळ व सायंकाळ लहान मुले आणि नागरिकांना होणार आहे. अंबाझरी तलावाच्या काठावर हिरवेगार वनक्षेत्र लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
कार्यक्रमादरम्यान दीक्षित यांनी परिसरातील वृक्षांचे निरीक्षण केले. वृक्ष वाढीसाठी ठिंबक सिंचनाची सोय आहे. वनक्षेत्रात विविध पक्ष्यांची चहलपहल वाढली आहे. यंदाच्या पावसाळ्यात वनक्षेत्राला फायदा होणार आहे.
स्केटिंगच्या मुलांना प्रमाणपत्र
काही दिवसांपूर्वी पर्यावरणाचा संदेश देत मेट्रोच्या कस्तूरचंद पार्क येथील माहिती केंद्रापासून ९८ मुले स्केटिंग करीत मेट्रो रेल्वेच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयात पोहोचली होती. नेतृत्व स्वप्नील समर्थ यांनी केले होते. कार्यक्रमात बृजेश दीक्षित यांच्या हस्ते मुलांचा सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले. ही मुले मेट्रोच्या चारही बाजूने स्केटिंगने जावीत, असे दीक्षित म्हणाले.
मिहानमधील इको पार्कमध्ये वृक्षारोपण
महामेट्रो रेल्वेला डेपोसाठी मिहानमध्ये २६ हेक्टर जागा मिळाली आहे. ही जागा जवळपास ८० मीटर रुंद आणि तीन कि़मी. लांब आहे. रविवारी दीक्षित यांच्या हस्ते पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. १३ एकर जागेवर इको पार्क विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय अॅग्रो टुरिझम, इकॉनॉमिक झोन, इको पार्क स्टेशन, मनोरंजन झोन, लॉन, क्लब हाऊस, स्वतंत्र रस्ता, खेळांसाठी अंतर्गत व बाहेर खेळांची सोय तसेच रेल्वे धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी झाडांना देण्यात येणार आहे. आर्किटेक्ट काम करीत आहेत. इको पार्कचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचे मेट्रोचे संदीप बापट यांनी सांगितले. यावेळी महामेट्रोचे वित्त संचालक शिवमाथन, उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क व समन्वयक) शिरीष आपटे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.