विवेक पाेलशेट्टीवार यांना रसायनशास्त्राचा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार
By निशांत वानखेडे | Updated: August 7, 2024 21:55 IST2024-08-07T21:54:52+5:302024-08-07T21:55:48+5:30
वातावरणातील कार्बन पकडण्यात संशाेधन : नागपूर-यवतमाळचा सन्मान.

विवेक पाेलशेट्टीवार यांना रसायनशास्त्राचा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार
निशांत वानखेडे, नागपूर : वायू प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये सर्वात माेठा उल्लेख कार्बनचा हाेताे. मात्र प्रदूषणाच्या स्राेतांमधून हा कार्बन स्वतंत्र करून त्याचे उपयाेगी घटकात रुपांतर केले तर माेठी समस्या दूर हाेऊ शकते. यावरच महत्त्वपूर्ण संशाेधन करणारे प्रा. डाॅ. विवेक पाेलशेट्टीवार यांना यंदाचा रसायनशास्त्राचा एस.एस. भटनागर (राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार) जाहीर झाला आहे. येत्या २३ ऑगस्ट राेजी भारताचे राष्ट्रपती यांच्याहस्ते राष्ट्रपती भवनात त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
भारतातील नोबेल पुरस्कार म्हणून हा पुरस्कार ओळखला जाताे व वेगवेगळ्या विषयात महत्त्वपूर्ण संशाेधनासाठी ताे प्रदान करण्यात येताे. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील मांगली (मुकुटबन) येथील रहिवासी पाेलशेट्टीवार यांचे प्राथमिक व उच्च शिक्षण अमरावती विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतूनही आपले शिक्षण पूर्ण केले. सध्या त्यांचे कुटुंब नागपूर येथे स्थायी झाले आहे. डाॅ. विवेक पाेलशेट्टीवार हे मागील ११ वर्षापासून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) येथे प्राध्यापक व वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.
हवामान बदल, जागतिक तापमानवाढ या विषयावर संशाेधन करीत असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिकात त्यांचे १५० हून अधिक संशाेधन पत्र प्रसिद्ध झाले आहेत व १२ पेटेंट त्यांच्या नावाने नाेंदविले आहेत. वातावरणातील ‘कार्बन कॅप्चरिंग’साठी त्यांच्या टीमकडून संशाेधन सुरू आहेत. कार्बन कॅप्चरिंगचे वेगवेगळे प्रयाेग भविष्यात क्रांतिकारी ठरतील, असा विश्वास त्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केला. हा पुरस्कार टीआयएफआर, मुंबईतील संशोधन समूहाच्या विज्ञान आणि उत्प्रेरक क्षेत्रातील उत्कृष्टता आणि नवकल्पनांच्या सततच्या प्रयत्नांचा पुरावा असल्याचे ते म्हणाले. या पुरस्कारासाठी त्यांनी आई-वडील, पत्नी तसेच मार्गदर्शक व सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.