राष्ट्रीय ग्राहक आयोग : मेडिकल, सुपरला ३० लाख रुपये भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 20:07 IST2020-01-02T20:05:12+5:302020-01-02T20:07:32+5:30
एचसीएल इन्फोसिस्टम्स व इतर दोन संबंधित कंपन्यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला ३० लाख रुपये भरपाई व त्यावर ६ टक्के व्याज अदा करावे असा आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.

राष्ट्रीय ग्राहक आयोग : मेडिकल, सुपरला ३० लाख रुपये भरपाई द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिजिटलायझेशन कराराचे काटेकोर पालन करण्यात अपयशी ठरलेल्या एचसीएल इन्फोसिस्टम्स व इतर दोन संबंधित कंपन्यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला ३० लाख रुपये भरपाई व त्यावर ६ टक्के व्याज अदा करावे असा आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. ३० लाख रुपये भरपाईवर आयोगातील तक्रारीच्या तारखेपासून ते प्रत्यक्ष भरपाई अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी एचसीएल कंपन्यांना ४५ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.
राज्य सरकारने मेडिकल व सुपरस्पेशालिटीचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांतर्गत आवश्यक संगणक व सॉफ्टवेअर पुरविण्यासाठी एचसीएल कंपनीला ९८ कोटी रुपयांत कंत्राट देण्यात आले होते. करारानुसार एचसीएलने संगणकांचा पुरवठा केला, पण सॉफ्टवेअर दिले नाही. त्याकरिता एचसीएलने नागपुरातील कंपनीशी उपकरार केला होता. त्यानंतरही सॉफ्टवेअर मिळाले नाही. परिणामी, मेडिकल अधिष्ठात्यांनी आयोगात तक्रार दाखल केली. एचसीएलने कराराचे काटेकोर पालन करायला हवे होते. सॉफ्टवेअर पुरवण्याची जबाबदारी एचसीएलची होती. परंतु, त्यांनी कराराचे उल्लंघन केले. त्यामुळे प्रशासनाला प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला असे तक्रारीत नमूद करण्यात आले. आयोगाच्या नोटीसनंतर एचसीएल कंपनीने लेखी उत्तर दाखल करून स्वत:ची बाजू स्पष्ट केली व तक्रार खारीज करण्याची विनंती केली. शेवटी आयोगाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता हा आदेश दिला. मेडिकलतर्फे अॅड. भानुदास कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.