National Consumer Commission: Modi, Choksi's Gitanjali Infrastructure hammered | राष्ट्रीय ग्राहक आयोग : मोदी, चोकसीच्या गीतांजली इन्फ्रास्ट्रक्चरला दणका
राष्ट्रीय ग्राहक आयोग : मोदी, चोकसीच्या गीतांजली इन्फ्रास्ट्रक्चरला दणका

ठळक मुद्देतक्रारकर्त्यांना भरपाई देण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंजाब नॅशनल बँकेला सुमारे २० हजार कोटी रुपयांनी फसविणारे व्यावसायिक मेहुल चोकसी व नीरव मोदी हे संचालक असलेल्या गीतांजली इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. कंपनीविरुद्ध तक्रार करणाऱ्या ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश जारी करण्यात आले आहेत.
कंपनीविरुद्ध प्रमोद टिक्कस, मयूर मोदी, रणजित अग्रवाल व गमनजितसिंग यांनी तक्रार दाखल केली होती. या ग्राहकांना सर्व सुविधांसह तीन महिन्यात फ्लॅटस्चा ताबा देण्यात यावा, त्यांच्याकडून वेळोवेळी घेतलेल्या रकमेवर १० टक्के व्याज अदा करण्यात यावे आणि तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, असे आदेश आयोगाने कंपनीला दिले आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, ग्राहकांनी कंपनीच्या बोरिवली, मुंबई येथील योजनेतील थ्री-बीएचके फ्लॅटस् खरेदी केले आहेत. करारानुसार ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत फ्लॅटस्चा ताबा देणे आवश्यक होते. परंतु, कंपनीने कराराचा भंग केला. ही योजना अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. तसेच, योजनेत फ्लॉवर बेड, पार्किंग, जिम्नॅशियम, एसटीपी, जलतरण तलाव, योगा रुम, स्पा रुम, बॅन्क्वेट हॉल, सीसीटीव्ही इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. ग्राहकांनी गृह कर्ज घेतले आहे. त्याचा मासिक हप्ता त्यांना बँकेत जमा करावा लागत आहे. कंपनीने १२० ग्राहकांकडून सुमारे २०० कोटी रुपये घेतले आहेत. तक्रारकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर व अ‍ॅड. रोहन मालविया यांनी कामकाज पाहिले.

 


Web Title: National Consumer Commission: Modi, Choksi's Gitanjali Infrastructure hammered
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.