‘द राष्ट्रसंत’मुळे जगभरात विचार पोहोचतील
By Admin | Updated: April 7, 2017 02:49 IST2017-04-07T02:49:12+5:302017-04-07T02:49:12+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कुठलेही शिक्षण घेतलेले नसताना सर्वसामान्यांच्या थेट काळजात घुसतील

‘द राष्ट्रसंत’मुळे जगभरात विचार पोहोचतील
मान्यवरांचा विश्वास : ‘द राष्ट्रसंत’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन थाटात
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कुठलेही शिक्षण घेतलेले नसताना सर्वसामान्यांच्या थेट काळजात घुसतील असे प्रभावी विचार मांडून समाजप्रबोधन केले. आजच्या पिढीसाठी त्यांचे विचार उपयुक्त असून, प्राचार्य पद्माकर काणे यांनी लिहिलेल्या ‘द राष्ट्रसंत’ या इंग्रजी ग्रंथामुळे राष्ट्रसंतांचे विचार जगभरात पोहोचतील, असा विश्वास मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर आणि विजय प्रकाशनच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य पद्माकर काणे यांच्या ‘द राष्ट्रसंत’ या इंग्रजी ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शंकरनगरातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात झाले. व्यासपीठावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज मोझरीचे सचिव रामदासपंत चोरोडे, लेखक प्राचार्य पद्माकर काणे, ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर, विजय प्रकाशनचे सचिन उपाध्याय, डॉ. प्रदीप विटाळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना पुस्तकाचे अनुवादक संजय साल्पेकर म्हणाले, ‘द राष्ट्रसंत’मध्ये काणे यांनी ग्रामगीतेतील सर्व प्रश्न आणि उत्तरांचे संशोधन करून आढावा घेतल्याची माहिती दिली. गिरीश गांधी म्हणाले, अनेक संत मठाधिपती झाले. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणत्याही मठात गेले नाही. त्यांच्यावर गांधी विचारांचा प्रभाव होता. राष्ट्रसंतांची भूमिका आणखी विशद करण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आपल्या वडिलांचे हे पुस्तक त्यांचे अभ्यासपूर्ण संशोधन असल्याचे सांगून राष्ट्रसंतांचा एवढा अभ्यास असलेले वडील घरात असल्यामुळे घरातच विद्यापीठ असल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर यांनी आधुनिक काळात ओस पडलेली गावे समृद्ध करण्यासाठी राष्ट्रसंतांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे सांगितले.
लेखक पद्माकर काणे म्हणाले, पुस्तकाच्या प्रकाशनाला येण्याचे आश्वासन माझे मित्र जांबुवंतराव धोटे यांनी दिले होते. परंतु आज ते येथे नसल्याची खंत वाटत आहे. राष्ट्रसंतांचा रूढ अर्थाने भक्त नसलो तरी लहाणपणापासून त्यांना पाहत असल्यामुळे त्यांची भजने मूकपाठ होती. त्यातूनच हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रसंतांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. प्रदीप विटाळकर यांनी केले. संचालन श्याम धोंड यांनी केले. आभार रमेश बोरकुटे यांनी मानले.
कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)