‘नॅनोटेक्नॉलॉजी’तून शुद्ध होणार पाणी, तेल, धातू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 10:41 PM2019-08-12T22:41:28+5:302019-08-12T23:24:55+5:30

तंत्रज्ञान क्रांतीमध्ये ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा मौलिक वाटा असून या माध्यमातून अनेक अशक्यप्राय बाबी प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. याच ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा उपयोग करून ‘व्हीएनआयटी’तील सहयोगी प्राध्यापक डॉ.श्रीराम सोनवणे यांनी शुद्धीकरणासंदर्भात एक मोठा शोध लावला आहे.

Nanotechnology will purify water, oil, metals | ‘नॅनोटेक्नॉलॉजी’तून शुद्ध होणार पाणी, तेल, धातू

‘नॅनोटेक्नॉलॉजी’तून शुद्ध होणार पाणी, तेल, धातू

Next
ठळक मुद्दे‘व्हीएनआयटी’तील श्रीराम सोनवणे यांचा शोध‘अ‍ॅसिड’, ‘अल्कोहोल’सह विरघळलेल्या घटकांचीदेखील शुद्धीकरण प्रक्रिया होणार सोपी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंत्रज्ञान क्रांतीमध्ये ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा मौलिक वाटा असून या माध्यमातून अनेक अशक्यप्राय बाबी प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. याच ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा उपयोग करून ‘व्हीएनआयटी’तील सहयोगी प्राध्यापक डॉ.श्रीराम सोनवणे यांनी शुद्धीकरणासंदर्भात एक मोठा शोध लावला आहे. त्यांच्या संशोधनामुळे आता या तंत्रज्ञानाचा वापर करून जल, तेल व धातूंसह ‘अ‍ॅसिड’, ‘अल्कोहोल’सह विरघळलेल्या घटकांचे शुद्धीकरण करणे शक्य झाले आहे. ही प्रक्रिया उद्योगक्षेत्रासाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे त्यांना या संशोधनाचे ‘पेटंट’देखील मिळाले आहे. 


प्रत्येक औद्योगिक उत्पादनाच्या प्रकल्पामध्ये पृथक्करण आणि शुद्धीकरण प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची असते. विविध मौल्यवान धातू, तेल तसेच पाणी यांच्यामध्ये ‘कम्पाऊन्ड्स’, ‘मेटल कॉम्प्लेक्स’ इत्यादींचा समावेश असतो. त्यांचे शुद्धीकरण करणे ही अतिशय किचकट प्रक्रिया असते. सद्यस्थितीत रासायनिक प्रक्रिया उद्योगांत काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मात्र यातून ५० ते ६० टक्केच शुद्धीकरण होऊ शकते. शिवाय यासाठी खर्चदेखील बराच जास्त लागतो. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून डॉ.सोनवणे यांनी संशोधनाला सुरुवात केली.
डॉ.सोनवणे यांनी याअगोदर ‘नॅनो कॉम्पोसाईट्स’, ‘नॅनोफ्लूइड्स’ यावर संशोधन केले आहे. त्यामुळे त्यांनी ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा वापर करूनच नवीन प्रक्रिया करण्याचा निश्चय केला. अगोदर ‘रँडम पॅकिंग’ वापरले जायचे. मात्र यात दोन वेगवेगळे पदार्थ एकमेकांमध्ये मिश्रित होण्याचा धोका होता. ‘नॅनो पार्टिकल’ कोणत्याही द्रव पदार्थात सहजपणे मिश्रित होत नाही. त्यांचाच उपयोग करण्याचे डॉ.सोनवणे यांनी ठरविले. सुमारे वर्षभर त्यांचे प्रयोगशाळांमध्ये प्रयोग चालले. काहीवेळा अडथळेदेखील आले. मात्र त्यांची जिद्द कायम होती. त्यातूनच त्यांनी यश खेचून आणले व ‘नॅनो पॅकिंग एक्स्ट्रॅॅक्शन’ प्रक्रियेचा शोध लावला. या प्रक्रियेतून १०० टक्क्यांच्या जवळपास शुद्धीकरण शक्य झाले आहे. या प्रक्रियेत त्यांना राहुल शर्मा यांचेदेखील योगदान लाभले.
‘नॅनो टेक्नॉलॉजी’चा पुरेपूर वापर हवा
‘नॅनो टेक्नॉलॉजी’चा अद्याप पूर्णपणे वापर केला जात नाही आणि रासायनिक प्रक्रियेचा खर्च कमी करण्याची ‘नॅनो टेक्नॉलॉजी’मध्ये प्रचंड क्षमता आहे. उत्पादनांच्या गुणवत्तेशी तडजोड न करता रासायनिक प्रक्रियेतील जटीलता कमी व्हावी, अशी उद्योगक्षेत्राची मागणी असते. शुद्धीकरणाची प्रक्रिया सोप्या प्रकारे व्हावी, हा माझा मानस होता. त्यात यश मिळाले याचे समाधान आहे. या शोधामुळे शुद्धीकरण प्रक्रियेची जटीलता आणि एकूण किंमत कमी होणार आहे. याचा थेट उत्पादन खर्च कमी होण्यासाठी फायदा होईल, असे डॉ.श्रीराम सोनवणे यांनी सांगितले. भारत सरकारच्या प्रकल्पांवरदेखील ते काम करीत आहेत.
अशी आहे प्रक्रिया
डॉ.श्रीराम सोनवणे यांनी ‘नॅनोसाईज्ड पॅकिंग’ सामग्रीचा संशोधनात वापर केला. या सामग्रीमुळे वस्तूमान हस्तांतरणाचा दर वाढतो. त्यामुळे प्रत्यक्ष ‘ऑपरेशन’ची कार्यक्षमता वाढते. ‘नॅनोपॅकिंग मटेरियल’चे वस्तूमान बदलून ‘ऑपरेशन’ची कार्यक्षमता नियंत्रित करता येऊ शकते. या प्रक्रियेत दोन द्रव पदार्थांना एकत्र केले जाते. यात प्रामुख्याने जलीय द्रव व सेंद्रिय द्रव तसेच ‘नॅनो पार्टिकल’ सामग्री असते. ‘एक्सट्रॅक्शन कॉलम’मधील दोन्ही पदार्थांच्या या संवादामुळे द्रवक प्रथम द्रवातून दुसऱ्या द्रव पदार्थात हस्तांतरित होतो. ‘नॅनोपार्टिकल मटेरियल’ची भर घालण्यामुळे वस्तूमान हस्तांतरण दर वाढतो. या वाढीव वस्तू-हस्तांतरण दरामुळे एकूण प्रक्रियेची कार्यक्षमता वाढते.
संशोधनाचा असा होऊ शकतो फायदा

  • अन्न उद्योगात, डीएनए शुद्धीकरण, अमाईन शुद्धीकरण या ठिकाणी या संशोधनामुळे मोठा फायदा होऊ शकतो.
  • या प्रक्रियेमुळे फिनोल्स, अनिलीन आणि नायट्रेटेड अरोमेटिक्स यासारख्या गोष्टी सहजपणे सांडपाण्यातून काढल्या जातात.
  • सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेत याचा वापर होऊ शकतो.
  • उद्योगांमध्ये पाण्याचा अधिक कार्यक्षमतेने परत वापर होऊ शकतो.
  • उद्योगांमध्ये कोबाल्ट, तांबे, निकेल, जस्त, प्लॅटिनम विविध पदार्थांतून वेगळे होऊ शकतात.
  • शुद्धीकरण प्रक्रिया स्वस्तात होणे शक्य
  • शाई, परफ्युम उद्योगांत ‘अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड’ वेगळे काढणे शक्य.

Web Title: Nanotechnology will purify water, oil, metals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.