कोरोना रुग्ण नियोजन समितीसाठी पाच तज्ज्ञांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 00:53 IST2020-09-08T00:51:13+5:302020-09-08T00:53:00+5:30
कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावीपणे उपचार व्हावेत. कोणत्याही रुग्णाला गैरसोयीचा फटका बसू नये, याकरिता रुग्णांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले होते. तसेच, यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून समितीकरिता पाच तज्ज्ञांची नावे सुचवली.

कोरोना रुग्ण नियोजन समितीसाठी पाच तज्ज्ञांची नावे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावीपणे उपचार व्हावेत. कोणत्याही रुग्णाला गैरसोयीचा फटका बसू नये, याकरिता रुग्णांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले होते. तसेच, यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून समितीकरिता पाच तज्ज्ञांची नावे सुचवली.
या तज्ज्ञांमध्ये मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, मेडिकलमधील मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. राजेश गोसावी, पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. दिनकर कुंभलकर व मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख डॉ. सुनंदा श्रीखंडे यांचा समावेश आहे. उच्च न्यायालयाने समिती स्थापन केल्यास हे तज्ज्ञ समितीमध्ये कार्य करण्यास तयार आहेत. ही समिती कोरोना रुग्णांचे नियोजन करेल. लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांची त्यांची प्रकृती व वय विचारात घेऊन विभागणी करेल. त्यानंतर त्यांच्यावरील उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शिका जारी करेल असे या प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सांगण्यात आले.
मेडिकलमध्ये ६०० खाटा
अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मेडिकलमध्ये कोरोना रुग्णांसाठी ६०० खाटांचे सेंटर आहे. त्यातील ५१० खाटा सध्या उपयोगात असून त्यात २०० खाटा आयसीयू तर, ३१० खाटा एचडीयू श्रेणीतील आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे ९० खाटा उपयोगात नाहीत. या ठिकाणी १३५ डॉक्टर, २०० परिचारिका, २० तंत्रज्ञ, १०४ स्वच्छता कर्मचारी व १५० सहायक कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये २४ तास कार्य करतात.