¦गर्दी वाढू देऊ नका, दुकानदारांनी करावी तपासणी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:39+5:302021-02-13T04:10:39+5:30
मनपा आयुक्तांची व्यापाऱ्यांशी चर्चा : दहा दिवसांच्या कामाचे नियोजन करा नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहून ...

¦गर्दी वाढू देऊ नका, दुकानदारांनी करावी तपासणी ()
मनपा आयुक्तांची व्यापाऱ्यांशी चर्चा :
दहा दिवसांच्या कामाचे नियोजन करा
नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहून महापालिका आयुक्त राधाकृष्णन् बी यांनी शहरातील व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, व्यापारी परिसरात मागील महिनाभरात अधिक गर्दी वाढली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. दुकानात ५ पेक्षा अधिक नागरिकांची गर्दी होऊ नये याकडे लक्ष पुरवा. आगामी १० दिवसांच्या कामाचे नियोजन करा. शहरात ५० पेक्षा अधिक कोरोना तपासणी केंद्रे आहेत. त्यासाठी महिनाभरात एकदा व्यापारी संघटना, हॉटेल व्यावसायिक व कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शुक्रवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आयुक्तांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. पूर्वी दुकानात प्रवेश करताना थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत होती. सॅनिटायझर लावण्यात येत होते. परंतु आज या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी आपल्यासह दुसऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. त्यासाठी नियमांचे पालन करावे लागणार आहे. दुकानदारांनी आगामी १० दिवसांच्या कामाचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, राजेश भगत, रवींद्र भेलावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव मदन केदार, नागपूर रेसिडेंशीयल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंह रेणु, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सचिव रामअवतार तोतला, सहसचिव स्वप्निल अहिरकर, नागपूर चिल्हर किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक, स्टेनलेस स्टील बाजार संघटनेचे अध्यक्ष रामकिशोर काबरा, मनोज लटुरिया उपस्थित होते.
...............