नागपूरचे 'थ्री इडिएट्स' तयार करतात देशभरातील संस्थांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा
By निशांत वानखेडे | Updated: May 12, 2025 11:13 IST2025-05-12T11:12:42+5:302025-05-12T11:13:13+5:30
Nagpur : १५ लाख ते १५ कोटींपर्यंतच्या प्रयोगशाळा

Nagpur's 'Three Idiots' create modern laboratories in institutions across the country
निशांत वानखेडे
नागपूर : पुस्तकी अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्यपूर्ण विकासासाठी प्रयोगशाळेतील प्रात्याक्षिकाचा अनुभव अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, भारतातील फार थोड्या शैक्षणिक संस्था प्रयोगशाळांनी सुसज्जित असतात, ही शोकांतिका आहे. ही गरज लक्षात घेत नागपूरच्या तीन तरुण अभियंत्यांनी देशातील शैक्षणिक संस्थांना आधुनिक प्रयोगशाळांनी सुसज्जित करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. या 'थ्री इडिएट्स'नी देशातील आयआयटी, एनआयटी अशा प्रिमियम संस्थापासून आदिवासी भागातील शाळांपर्यंत अत्यल्प खर्चात ८५ हून अधिक लॅब विकसित केल्या आहेत.
प्रतीक गडकर, मिर्झा असीम वेग आणि गोविंद सहस्त्रबुद्धे हे ते नागपूरचे तीन अभियंते आहेत, ज्यांच्या सुपिक डोक्यातून ही मानवीय संकल्पना साकार झाली आहे. त्यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या टेक्नोव्हेंटर इनोव्हेशन (टीआय) या नागपूर बेस्ड कंपनीच्या माध्यमातून हे कार्य सुरू केले आहे. त्यांच्या या कार्याला आता राज्य सरकारचेही पाठबळ मिळाले आहे. देशभरातील २५०० हून अधिक स्टार्टअपच्या स्पर्धेत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे निवडलेल्या सर्वोत्तम २४ स्टार्टअप मध्ये टीआयला सन्मान मिळाला आहे. हा सन्मान मिळविणारा टीआय हा विदर्भातील एकमेव स्टार्टअप आहे.
महाराष्ट्र सरकारकडून टीआयला १५ लाख रुपयांचे वर्क ऑर्डर आश्वासन मिळाले आहे. या पाठिंब्यामुळे लहानमोठ्या शहरांमधील आयटीआय आणि शाळांमध्ये सरकार-समर्थित सुसज्जित प्रयोगशाळा स्थापन करणे शक्य होईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यावहारिक कौशल्य विकास, जलद प्रशिक्षणाचा लाभ मिळेल, अशी भावना प्रतीक गडकर यांनी व्यक्त केली. नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री मंगलप्रसाद लोढा आणि विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्या समोर टीआयने सादरीकरण केले. लवकरच सरकारच्या मदतीने जळगाव जिल्ह्यात प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या प्रकल्पावर काम करीत असल्याचे प्रतीक यांनी सांगितले.
१५ लाख ते १५ कोटींपर्यंतच्या प्रयोगशाळा
२०१६ मध्ये स्थापन केलेल्या टेक्नोव्हेंटर इनोव्हेशन्सद्वारे संपूर्ण भारतात ८५ हून अधिक प्रयोगशाळा तयार करीत आयआयटी, एनआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, आयटीआय, शाळा आणि इनोव्हेशन हबमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे. आयआयटी इंदोर, एनआयटी गोवा, आयआयटी जम्मू, आयआयटी मुंबई या मोठ्या संस्थापासून छत्तीसगडच्या दंतेवाडामध्येही लॅब तयार केल्या आहे. लॅबचे डिझाइन, उपकरणांची निवड, त्यांचे फर्निचर, साहित्य इन्स्टॉलेशन आणि प्रशिक्षणही देण्याचे काम टीआय करते. प्रशिक्षणासाठी विदर्भातील तरुणांना प्रशिक्षित केले जात आहे. संस्थेच्या गरजेनुसार १५ लाख ते १५ कोटींपर्यंत खर्चाच्या प्रयोगशाळा तयार करण्याची क्षमता असल्याचे प्रतीक गडकर यांनी सांगितले.
लिंबू सरबत मशीन ते कोविडचे फेस शिल्ड
प्रतिक गडकर यांनी २०१५ मध्ये पहिल्यांदा लिंबू शरबत बनविण्याचे मशीन तयार केले होते, ज्याला भारत सरकारकडून सर्वोत्तम इनोव्हेशनचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर कोविड काळात टीआय कंपनीद्वारे फेस शिल्ड तयार केले. देशभरात १० लाख फेस शिल्ड वितरित करण्यात आले, ज्यासाठी सरकारकडून २०२० मध्ये सन्मानित करण्यात आले होते.