नागपूरचे संपत रामटेके यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 22:53 IST2018-01-25T22:45:40+5:302018-01-25T22:53:33+5:30
आयुष्यातील २६ वर्षे सिकलसेल प्रतिबंधासाठी देणारे दिवंगत संपत तुकाराम रामटेके यांना उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नागपूरचे संपत रामटेके यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुष्यातील २६ वर्षे सिकलसेल प्रतिबंधासाठी देणारे दिवंगत संपत तुकाराम रामटेके यांना उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रामटेके यांनी १७ नोव्हेंबर २०१७ रोजी जगाचा निरोप घेतला व दोन महिन्यानंतर हा सन्मान त्यांना घोषित झाला आहे. रामटेके यांच्या प्रयत्नांमुळेच ‘सिकलसेलग्रस्तां’ची लढाई संसदेत पोहोचली होती. त्यांचा त्याग व संघर्ष यांच्यामुळेच ‘सिकलसेलग्रस्तां’ना शासनाच्या सोयीसवलती मिळाल्या होत्या, हे विशेष.
एकुलता एक मुलगा हर्षल रामटेके हा ‘सिकलसेलबाधित’ असल्याचे कळल्यावर त्यांनी या आजाराची वस्तुस्थिती जाणून घेतली. महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात सिकलसेलचा प्रभाव असल्याने हा आजार सामाजिक समस्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या रुग्णांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. ‘सिकलसेलग्रस्तां’ना सोयी मिळवून देण्यासाठी झटत असताना या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम राबविले. सिकलसेलग्रस्तांसाठी लढणे हेच आयुष्याचे अंतिम ध्येय त्यांचे होते. त्यांच्या निधनानंतर मौलिक कार्याला ‘पद्मश्री’ पुरस्काराच्या माध्यमातून केलेले हे अभिवादनच असल्याची सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे.