लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : 'ऑपरेशन सिंदूर 'दरम्यान पाकिस्तानवर ड्रोन हल्ल्यात भारतीय सशस्त्र दलांनी नागपूरस्थित सोलर इंडस्ट्रीजच्या 'नागास्त्र'चा वापर केला. या युद्धात, नागपुरात बनवलेले 'नागास्त्र' हे भारतीय सैन्याचे एक शक्तिशाली शस्त्र बनले आहे. हे कळताच, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी सोलर इंडस्ट्रीज इंडियाचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांच्याशी संवाद साधला आणि या कामगिरीबद्दल आणि देशाच्या सुरक्षेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी सत्यनारायण नुवाल यांनी डॉ. दर्डा यांना सांगितले की, त्यांच्या कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर भारतीय सैन्य देशाच्या सुरक्षेसाठी करत आहे, याचा त्यांना अभिमान आहे. डिसेंबर २०२४ मध्येच भारतीय सेनेला अधिकृतपणे 'नागास्त्र-१' ड्रोन मिळाले, हे विशेष.
पंतप्रधान मोदींनीही केली होती पाहणीगेल्या ३० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या सोलार प्लांटमध्ये विविध श्रेणीतील ड्रोनसाठी धावपट्टी सुविधेचे उद्घाटन करून सोलार इंडस्ट्रीजची पाहणी केली होती. त्यावेळी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड येथे यूएव्हीसाठी लोइटरिंग म्युनिशन टेस्टिंग रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन केले. युनिट सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने विकसित केलेल्या 'नागास्त्र-३' कामिकेज ड्रोन सिस्टीमची पाहणी केली होती. त्यावेळी हे ड्रोन प्रोटोटाइप टप्प्यात होते.
वैशिष्ट्य
- या ड्रोनची रेंज १०० किलोमीटरपर्यंत आहे आणि ते सतत ५ तास हवेत उडाण भरू शकते. ही क्षमता नागास्त्राच्या मागील आवृत्तीपेक्षा अधिक जास्त आहे.
- याची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे छुपा हल्ला चढवता येतो. यामुळे शत्रूला सावध होण्याची संधी मिळत नाही.
- हे रिअल टाइम व्हिडीओ तर बनवतेच शिवाय पाळत ठेवण्यासाठी आणि हल्ला करण्यासदेखील सक्षम आहे.
- यात पॅराशूट रिकव्हरी सिस्टम आहे. याचा अर्थ असा की जर मिशन रद्द झाले तर ते सुरक्षितपणे परत बोलावता येते.