कुलगुरूपदासाठी नागपूरकर ‘गुरू’

By Admin | Updated: July 3, 2016 02:40 IST2016-07-03T02:40:36+5:302016-07-03T02:40:36+5:30

स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या मुंबईतील ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठाच्या (श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ) कुलगुरुपदी नागपूरकर ...

Nagpur's 'Guru' for Chancellor | कुलगुरूपदासाठी नागपूरकर ‘गुरू’

कुलगुरूपदासाठी नागपूरकर ‘गुरू’

नागपूर : स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या मुंबईतील ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठाच्या (श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ) कुलगुरुपदी नागपूरकर डॉ. शशिकला वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या विभागप्रमुख आहेत. मागील महिन्यातच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.मुरलीधर चांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यातील तीन महत्त्वाच्या विद्यापीठांच्या कुलगुरुपदी नागपूरकर कुलगुरू असून आता डॉ. वंजारी यांच्या निवडीमुळे शिक्षणक्षेत्रात नागपूरची मान आणखी उंच झाली आहे.

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी शनिवारी डॉ.शशिकला वंजारी यांच्या नावाची घोषणा केली. डॉ.वंजारी यांनी नागपूर विद्यापीठातूनच जीवरसायनशास्त्र विषयात ‘एमएसस्सी’ केले. त्यानंतर त्यांनी इंग्रजी व शिक्षणशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. सुरुवातीपासूनच डॉ. शशिकला वंजारी यांना शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांत शिकविण्याचा ३० वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. नागपूर विद्यापीठात २००० साली सहयोगी प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याअगोदर त्या भंडारा, यवतमाळ येथील शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कार्यरत होत्या. नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या त्या २००६ ते २०१२ आणि २०११ ते २०१२ या कालावधीत प्रमुख होत्या. विविध पुस्तकांचे लेखन, सामाजिक कार्य यासाठीदेखील त्या परिचित आहेत.

महिला विकासासाठी काम करण्याची संधी : डॉ.वंजारी
नागपूर : सुरुवातीपासून माझा प्रामाणिक कामावर विश्वास आहे. माझ्या मार्गात अनेक अडथळे आले, समस्या आल्या. परंतु मी काम करत राहिले. ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी ही माझ्यासाठी संधीच आहे व या माध्यमातून मी महिला विकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल. विद्यापीठाच्या विकासासाठी मी स्वत:ला पूर्णत: झोकून काम करणार, असे मत डॉ.शशिकला वंजारी यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)

Web Title: Nagpur's 'Guru' for Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.