‘केपी की पोहा टपरी’ फेमस रुपम साखरे यांचे निधन, तर्री पोह्याची चव हरपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 14:27 IST2022-01-12T13:56:39+5:302022-01-12T14:27:37+5:30

नागपुरातील फेमस ‘केपी की पोहा टपरी’वाले रुपम साखरे यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले.

nagpurs famous Tarri Poha seller Roopam Sakhare passed away | ‘केपी की पोहा टपरी’ फेमस रुपम साखरे यांचे निधन, तर्री पोह्याची चव हरपली

‘केपी की पोहा टपरी’ फेमस रुपम साखरे यांचे निधन, तर्री पोह्याची चव हरपली

नागपूर : तर्री पोह्याने अख्या नागपुरला वेड लावणारे रुपम साखरे यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने कस्तुरचंद पार्क परिसरातील तर्रीबाज पोह्याची चव कायमची हरवली आहे. 

मोहननगरातील रुपम साखरे यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. मात्र, ५० वर्षांपूर्वी त्यांनी कस्तुरचंद पार्क परिसरातील फुटपाथवर पोहे विकण्याचा व्यवसाय सुरू केला आणि हळू-हळू त्यांच्या तर्री-पोह्याची अख्या नागपूरला गोडी लागली. हार्ड वर्क पेज बॅक म्हणतात ना तसेच रुपम यांच्या व्यवसायाने त्यांनी फक्त नागपुरातच नव्हे तर देश-विदेशातही ओळख मिळवून दिली. शुन्यातून उभं केलेल्या व्यवसायाने त्यांना नाव, पैसा, प्रसिद्धी व यश सर्व दिले.

गरमागरम पोहे, तर्री आणि त्यावर अर्ध टमाटर व त्यात ओतलेलं प्रेम हेच त्यांच्या शैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांनी सुरू केलेल्या पोह्याचा छोटासा व्यवसाय ज्यातून त्यांना  ‘केपी की पोहा टपरी’ अशी ओळख मिळाली. ही ओळख हळूहळू देशपातळीवर पोहोचली. सकाळी ८:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत ते पोहे विक्री करत. त्यांच्या दुकानावर खाणाऱ्यांची गर्दी कधीच कमी होत नव्हती. त्यांनी तयार केलेले पोहे हे देशाविदेशातही पोहचले होते, हे विशेष. विदेशी लोकही हातात प्लेट घेऊन त्यांच्या हाताने तयार केलेले तर्री पोहे आवडीने खात.  

रुपम यांनी तयार केलेले पोहे ही नागपूरची ओळख बनली. स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. ते चर्चेत आले ते दरवर्षी कुटुंबाला घेऊन विदेशवारी करतात म्हणून..  दरवर्षी रुपम प्राप्तीकरही भरत होते. पण, त्यांनी श्रीमंतीचा कधी आव आणला नाही. दुकानात आल्यानंतर खाकी कपडे परिधान करत हातात सराटा घेऊन कढईत पोहे तयार करीत असत.

वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी आपला देह सोडला. त्यांच्यावर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा आहे. त्यांच्या जाण्याने नागपुरातील तर्रीबाज पोह्याची चवच जणू हरपली आहे. 

Web Title: nagpurs famous Tarri Poha seller Roopam Sakhare passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.