नागपूरचे कामगार विमा रुग्णालय ‘आॅक्सिजनवर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:30 IST2018-03-10T00:30:06+5:302018-03-10T00:30:16+5:30
सुमारे दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात अद्ययावत उपकरण व सोयींच्या अभावाने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे, असे असताना आता केवळ १५ दिवस पुरेल एवढाचा औषधांचा साठा शिल्लक असल्याने हे रुग्णालय ‘आॅक्सिजन’वर आल्याचे बोलले जात आहे.

नागपूरचे कामगार विमा रुग्णालय ‘आॅक्सिजनवर’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुमारे दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात अद्ययावत उपकरण व सोयींच्या अभावाने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे, असे असताना आता केवळ १५ दिवस पुरेल एवढाचा औषधांचा साठा शिल्लक असल्याने हे रुग्णालय ‘आॅक्सिजन’वर आल्याचे बोलले जात आहे.
नागपूर जिल्ह्यात सुमारे तीन हजार लहान मोठे उद्योग आहेत. यात सुमारे दीड लाखांवर कामगार आहेत. उद्योग व कारखान्यात शिसे, फॉस्फरस, सफ्लाईन, बेझिंन, मॅगनीज इत्यादी घातक रसायने व नायट्रटेच्या धुरामुळे कामगारांना छातीचे तसेच इतरही आजार होतात. त्यांचे आरोग्य सांभाळले जावे म्हणून नागपुरात कामगार रुग्णालये स्थापन करण्यात आली. या कामगारांकडून कोट्यावधीची रक्कम शासनाकडे जमा होते, परंतु येथे गंभीर रुग्णांवर उपचारच होत नसल्याचे चित्र आहे. गुंतागुंतीच्या प्रसुतीच्या शस्त्रक्रिया ते मोठ्या शस्त्रक्रियांसाठी मेडिकल किंवा खाजगी रुग्णालयांची वाट धरावी लागते. यात औषधांचा तुटवड्यामुळे रुग्णच नाही तर रुग्णालय प्रशासनही अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे, औषध खरेदी घोटाळ्यांना पायबंद घालण्यासोबतच एकत्रित औषधे खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्याची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१८ पासून ही कंपनी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनस्त वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांसाठी औषधे खरेदी करणार होती. मात्र दीड महिन्याचा कालावधी होऊनही रुग्णालयांना औषधे उपलब्ध झाली नाही. यामुळे सर्वच रुग्णालये अडचणीत आली आहेत. यात सर्वाधिक फटका बसला आहे तो कामगार विमा रुग्णालयाला. येथे केवळ १५ दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा शिल्लक आहे.
औषधांसाठी प्रस्ताव पाठविला आहे
रुग्णालयासाठी आवश्यक औषधे खरेदीचा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. परंतु औषध खरेदीचे अधिकार ‘हाफकिन’ कंपनीला देण्यात आल्याने हा प्रस्ताव या कंपनीकडे असल्याचे समजते. रुग्णालयात मार्च महिना पुरेल एवढा औषधांचा साठा आहे. याची माहितीही आयुक्तांना देण्यात आली आहे.
-डॉ. मीना देशमुख
वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय