लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांची प्रधान सचिवांकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यांच्याविरुद्ध विविध कर्मचारी संघटनांच्या तक्रारी, गैरव्यवहाराची प्रकरणे व स्वत: प्रधान सचिवांच्या कार्यालयीन आदेशाची अवमानना आदी तक्रारी आहेत. यासाठी विभागाच्या प्रधान सचिवाची विशेष समिती सोमवारी (१६ डिसेंबर) जिल्हा परिषदेत दाखल होणार असल्याची माहिती आहे़दरम्यान, ही समिती कार्यकारी अभियंता टाकळीकर यांच्या कालखंडात झालेल्या सर्व कामांचा विषयनिहाय आढावा घेणार असल्याची माहिती आहे. समितीत स्वत: प्रधान सचिव आणि इतर उपसचिव व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश राहील़ सद्यास्थितीत टाकळीकर यांच्या बदलीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे़ त्यांची बदली हिंगोलीला झाली होती़ त्यांनी स्वत: शासनाच्याच आदेशाला आव्हान दिले़ त्यांच्या काळात पाणीपुरवठ्याच्या अनेक योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. तसेच ते चौकशी समितीला सहकार्य करीत नाही, मंत्रालयीन अधिकाऱ्यांचाही आदेश पायदळी तुडवितात, असे आरोप त्यांच्यावर आहे़ सूत्रांच्या माहितीनुसार, फेटरी येथील विपश्यना केंद्रामधील पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून टाकळीकरांनी थेट सचिवांसोबत हुज्जत घातल्याची चर्चा आहे़ त्यामुळे ही बाब प्रधान सचिवांनी चांगलीच मनावर घेतली़ नागपुरात हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे़ त्यानिमित्त संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा शहरात तळ ठोकून आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठकही सोमवारी प्रस्तावित आहे़ तत्पूर्वी, ही चौकशी समिती टाकळीकरांची पेशी घेईल़ यापूर्वी टाकळीकरांवर मंत्रालयीन चौकशी सुरू आहे़ त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करता एसटी प्रवर्गावर नोकरी बळकावल्याचीही चर्चा जिल्हा परिषदेत आहे़
नागपूर जि.प. कार्यकारी अभियंत्याची चौकशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:01 IST