नागपूर जिल्हा परिषद : ‘कोरोना’वरून रंगला राजकीय कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 09:01 PM2020-07-24T21:01:46+5:302020-07-24T21:03:56+5:30

‘कोरोनाच्या काळातही आमचे नेते, पदाधिकारी जनतेच्या कल्याणासाठी बाहेर फिरतात, त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होते. तर भाजपचे नेते घरात बांगड्या भरून बसतात, त्यांना काही होत नाही,’ सभाध्यक्षांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी संताप व्यक्त करून सभेत चांगलाच गोंधळ घातला.

Nagpur Zilla Parishad: A colorful political Kalgitura on 'Corona' | नागपूर जिल्हा परिषद : ‘कोरोना’वरून रंगला राजकीय कलगीतुरा

नागपूर जिल्हा परिषद : ‘कोरोना’वरून रंगला राजकीय कलगीतुरा

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘कोरोनाच्या काळातही आमचे नेते, पदाधिकारी जनतेच्या कल्याणासाठी बाहेर फिरतात, त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होते. तर भाजपचे नेते घरात बांगड्या भरून बसतात, त्यांना काही होत नाही,’ सभाध्यक्षांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी संताप व्यक्त करून सभेत चांगलाच गोंधळ घातला. ऐन सभागृहात सभाध्यक्ष व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. जिल्हा परिषदेच्या सत्तांतरणानंतर पहिल्यांदाच सर्वसाधारण सभा पार पडली. ही सभा ग्रामीण भागातील समस्यांपेक्षा एकमेकांवर केलेल्या राजकीय कुरघोडीवरून चांगलीच रंगली.
जिल्हा परिषदेत सत्तांतर झाल्यानंतर संपूर्ण देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यामुळे जिल्हा परिषदेला सर्वसाधारण सभेसाठी ६ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. शुक्रवारी वनामतीच्या सभागृहात सभा झाली. जि.प.च्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांना क्वारंटाईन करण्यात आल्याने उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांना सभाध्यक्षांचे अधिकार बहाल करण्यात आले. सभेच्या सुरुवातीला सदस्य अवंतिका लेकुरवाळे यांनी कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उत्तम काम केले असून सदस्यांनी जिल्हा परिषद यंत्रणेचे कौतुक करावे, असा प्रस्ताव मांडला. यावर भाजपचे गट नेते अनिल निधान यांनी जिल्हा परिषदेने किती चांगले काम केले हे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अनुपस्थितीवरून लक्षात येते, असा टोला लगावला. त्यामुळे सभाध्यक्ष कुंभारे विरोधकांवर चांगलेच संतापले. त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जोरदार ताशेरे ओढले. यानंतर सभागृहात बराच काळ विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. अखेर ज्येष्ठ सदस्या शांता कुमरे आणि दिनेश बंग यांनी सामंजस्याची भूमिका घेत गोंधळ शांत केला. दरम्यान, सभेच्या सुरुवातीला कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन करण्यात आले. समीर उमप यांनी मांडलेल्या माजी आमदार सुनील शिंदे यांच्या शोकप्रस्तावाला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले आणि श्रद्धांजली वाहण्यात आली.

शिक्षक मित्राची नेमणूक
कोरोनाच्या संक्रमणामुळे ग्रामीण भागात शिक्षणाची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. त्यामुळे कृषी मित्राच्या धर्तीवर ग्रामीण भागात शिक्षक मित्राची नेमणूक करावी. गावातील डी.एड., बी.एड. झालेल्या तरुणांना शिक्षकांच्या सहयोगातून व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मानधन द्यावे, असा मुद्दा जि.प. सदस्य शांता कुमरे यांनी उपस्थित केला. त्यावर अनेक सदस्यांनी पाठिंबाही दर्शविला. सोबतच मुख्यालयात राहणाºया शिक्षकांनाच घरभाडे द्यावे, हा विषय सभागृहापुढे मांडून लक्ष वेधले.

सदस्यांना पडला सोशल डिस्टन्सिंगचा विसर
कोरोना संक्रमणाच्या काळात वनामतीच्या सभागृहात जिल्हा परिषदेची सभा पार पडली खरी, पण सरकार, पक्ष, नेते यावरून सभागृहात झालेल्या वादातून सदस्य एकमेकाना येऊन भिडले. कोरोनात सरकारने केलेली कामे आणि सरकार कसे अपयशी ठरले. यावरून शाब्दिक ओढताण चांगलीच रंगली. एकमेकांना हातवारे करीत सभागृहाच्या वेलमध्ये बराच वेळ सदस्य ताशेरे ओढत होते. यात काही सदस्यांनी मास्कसुद्धा घातलेले नव्हते. यावेळी आपण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही, याचा विसर सदस्यांना पडला होता.

विरोधकांची नारेबाजी
सभागृह सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी सभागृहात प्रवेश करताना, नागपूर जिल्हा कोरोनामुक्त करा अशा घोषणा देत सभागृहात प्रवेश केला. ग्रामीण भागात पसरलेल्या कोरोनावरून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला विरोधकांनी टार्गेट केले. दरम्यान सभा संपल्यानंतर संतप्त झालेल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. सभागृह चालू दिले नाही, आमच्या मागण्या सभागृहात मांडू दिल्या नाही, सत्ताधाºयांनी मनमानी केल्यामुळे नाराज झालेल्या विरोधकांनी तानाशाही नही चलेंगी अशा घोषणा देत सभागृहातच नारेबाजीला सुरुवात केली.

राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची काँग्रेस सदस्यावर नाराजी
सभागृहात काँग्रेसच्या सदस्य अवंतिका लेकुरवाळे यांनी मांडलेला विषय विरोधकांच्या जिव्हारी लागल्याने वादाची ठिणगी पडली. त्यामुळे बराच वेळ वादात गेला. नवीन आलेल्या सदस्यांना बोलू द्या, असे आवाहन राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून वारंवार होत होते. सभाध्यक्षांकडून वारंवार काँग्रेसच्या विशिष्ट सदस्यांना बोलण्याची संधी मिळत होती. अखेर राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांनी अध्यक्षांवरच नाराजी व्यक्त करीत, तुमच्या सदस्यांना समज द्या, असे अध्यक्षांनाच सुनावले.

दोन लाखात एन.ए.चे प्रमाणपत्र
दोन लाखात एन.ए.चे प्रमाणपत्र मिळते. ग्रामीण भागात बोगस कागपत्राच्या आधारे प्लॉटची खरेदी विक्री होत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गाजला. यामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे महसुलाचे नुकसान होत असून याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सभाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी प्रशासनाला दिले.

Web Title: Nagpur Zilla Parishad: A colorful political Kalgitura on 'Corona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.