गोव्यातील अपघातात नागपूरची महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 09:58 PM2019-12-27T21:58:22+5:302019-12-27T21:59:30+5:30

गोवा येथे खासगी बसने भीषण धडक दिल्यामुळे नागपुरातील महिला पर्यटक जागीच ठार झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास जुन्या मांडवी पुलाजवळ घडली.

Nagpur woman killed in Goa accident | गोव्यातील अपघातात नागपूरची महिला ठार

गोव्यातील अपघातात नागपूरची महिला ठार

Next
ठळक मुद्देखासगी बसने उडवले : जुन्या मांडवी पुलावरील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : गोवा येथे खासगी बसने भीषण धडक दिल्यामुळे नागपुरातील महिला पर्यटक जागीच ठार झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास जुन्या मांडवी पुलाजवळ घडली. स्नेहल दाभाळे (२८) असे मयत महिलेचे नाव असून त्या गुरुनानक ले-आऊट, वैशालीनगर, डिगडोह, हिंगणा रोड येथील रहिवासी होत्या. पोलिसांनी बसचालक दामोदर गावस (वय ६०, रा. चिंबल, पणजी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल या होंडा अ‍ॅक्टिव्हा (जीए ०३ एन ६६९४) दुचाकीने म्हापशाहून पणजीकडे जात होत्या. दरम्यान, माऊली शांतादुर्गा (जीए ०७ एफ ५०७७) या बसने त्यांना मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे स्नेहल रस्त्यावर फेकल्या गेल्या व त्यांचे डोके चिरडल्या गेले. ते दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. रस्त्यावर रक्ताचे थारोळे साचले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्ता धुवून स्वच्छ केला. अपघात पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी हळहळ व्यक्त केली. समाजमाध्यमांवरील छायाचित्रे पाहूनही लोकांनी दु:ख व्यक्त केले.

सकाळी गर्दीची वेळ
सकाळी राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक नोकरी-धंद्यानिमित्त राजधानी पणजीत येत असतात. त्या वेळेस पुलावर खूप गर्दी असते. वाहनांचा पूर वाहत असतो. या गर्दीत हा अपघात झाला. त्यामुळे वाहतुकीवर काही वेळ परिणाम झाला.

गाडी भाड्याची, हेल्मेट नाही
गोव्यात पर्यटकांना दुचाकी भाड्याने दिल्या जातात. ‘रेंट अ बाईक’ म्हणून हा व्यवसाय परिचित आहे. स्नेहल यांच्याकडे भाड्याची दुचाकी होती. अपघात घडला तेव्हा स्नेहल यांनी हेल्मेट घातले नव्हते, असा पोलिसांचा अंदाज आहे. ‘रेंट अ बाईक’च्या मालकाचा शोध सुरू आहे.

चेहरा ओळखणे अशक्य
स्नेहल गोव्यात कुठे राहत होत्या व त्यांच्यासोबत आणखी कोण आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्यांच्या पतीशीसुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. संपूर्ण चेहरा चिरडल्या गेल्याने तो ओळखता येत नाही. त्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. स्नेहल यांच्या शरीराच्या अन्य भागावर कुठेही गंभीर दुखापत झाली नाही.

Web Title: Nagpur woman killed in Goa accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.