नागपूर : पाकिस्तानातील एका धर्मगुरूला भेटण्यासाठी नागपुरातील ४३ वर्षीय महिला कारगिलमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या महिलेने तिच्या १२ वर्षांच्या मुलाला कारगिलमध्ये एका हॉटेलमध्ये सोडले. नागरिकांनी मुलाला पोलिसांच्या स्वाधीन केले असून, रविवारी कपिलनगर पोलिस आणि महिलेचा भाऊ मुलाला घेण्यासाठी कारगिलमध्ये जाणार असल्याची माहिती आहे.
सुनीता सतीश गटलेवार (४३) असे तिचे नाव आहे. सुनीताची आई निर्मला जामगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीताचा पती सतीश गटलेवार याने दुसरे लग्न केले. तिचा मुलगा आठवीत शिकत आहे. ती माझ्याकडेच राहून परिचारिकेचे काम करायची.
सोबतच साड्या विकणे, प्रॉपर्टीचे कामही करीत होती. तिने घरही विकत घेतले आहे. काही वर्षांपासून ती पाकिस्तानातील एका धर्मगुरूसोबत चॅटिंग करीत असल्याची माहिती आहे. ४ मेपासून ती बेपत्ता आहे.सुनीता हिने यापूर्वीही दोन वेळा अमृतसरच्या अटारी बॉर्डरवरून नियंत्रण रेषा ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला होता, असे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितले.