Nagpur Violence Update: नागपूरमध्ये झालेल्या दंगलीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीसांनी पुढील कारवाईचा प्लॅन सांगितला. महत्त्वाची बाब म्हणजे मालमत्तांचे नुकसान झालेल्या पुढील काही दिवसांत नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मालमत्तांचे नुकसान करणाऱ्यांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत. त्यांनी पैसे दिले नाही, तर त्यांच्या मालमत्ता विकणार, असे फडणवीस यांनी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नागपूर दंगल घटनेप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. 'कुराणची आयत असलेली चादर जाळल्याचा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार केला. त्यानंतर जमाव संध्याकाळी तयार झाला आणि तोडफोड केली. जाळपोळ केली', असे ते म्हणाले.
९२ जणांना अटक, १२ अल्पवयीन
"या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होते. त्याचबरोबर लोकांनीही मोबाईलवर केलेलं चित्रीकरण, पत्रकारांनी पोलिसांना दिलेलं चित्रीकरण. अशा चित्रिकरणामध्ये जे दंगेखोर दिसत आहेत, त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. १०४ लोकांची ओळख पटली आहे. ९२ लोकांना अटक करण्यात आली आहे. आणि १२ जण हे १८ वर्षाखालील विधिसंघर्षग्रस्त असल्यामुळे त्यांच्यावर कायद्याने जी कारवाई करता येते, ती करण्यात आली आहे", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
चिथावणीखोर पोस्ट करणाऱ्यांना सहआरोपी करणार
"ओळख पटवण्याचे काम अजूनही सुरू आहे. जो जो व्यक्ती दंगा करताना, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई करण्याची मानसिकता पोलिसांची आहे. याचसोबत सोशल मीडियाची पडताळणी करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा याला चिथावणी देण्यासाठी पोस्ट केल्या. त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवले जाणार आहे. कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकावण्यासाठी मदत केलेली आहे", असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.
"जवळपास ६८ पोस्ट या आतापर्यंत शोधण्यात आल्या आहेत आणि त्या हटवण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अजून काही पोस्टची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकावणारे पॉडकास्ट केले. ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून, लोकांमध्ये भितीचे वातावरण तयार केले. अशा सगळ्या लोकांवर कारवाई होईल", असे फडणवीस यांनी सांगितले.
दंगेखोरांच्या मालमत्ता विकून पैसे वसूल करणार - फडणवीस
"ज्या लोकांचे नुकसान झाले आहे. काहींच्या गाड्या फुटल्या आहेत. त्या सगळ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. आता जे काही नुकसान झालेलं आहे. ते सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल. दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत, तर त्यांची संपत्ती विकली जाईल. अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत", असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.