कलयुग ने अपना रूप धारण कर लिया है..! नागपूर हिंसाचारात सोशल मीडियावर पोस्ट करणारे अडकणार

By योगेश पांडे | Updated: March 20, 2025 23:45 IST2025-03-20T23:45:09+5:302025-03-20T23:45:34+5:30

सोशल मीडियावरील प्रक्षोक्षक पोस्टचे ‘पोस्टमॉर्टेम’ : हिंसाचार शेअर, कमेंट करणारे शेकडो कायद्याच्या कचाट्यात अडकणार

Nagpur Violence: Those who posted on social media about the Nagpur violence will be arrested | कलयुग ने अपना रूप धारण कर लिया है..! नागपूर हिंसाचारात सोशल मीडियावर पोस्ट करणारे अडकणार

कलयुग ने अपना रूप धारण कर लिया है..! नागपूर हिंसाचारात सोशल मीडियावर पोस्ट करणारे अडकणार

योगेश पांडे

नागपूर : सोमवारी नागपुरात झालेल्या दंगल प्रकरणात हिंसेला चिथावणी देण्यासाठी चार टप्प्यांमध्ये आरोपींनी सोशल माध्यमांचा जास्त उपयोग केला. सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणात चार गुन्हे दाखल झाले असून, जवळपास ५० हून अधिक आरोपींची नावे स्पष्ट झाली आहेत. मात्र, हिंसाचाराचे समर्थन करत भडकावू पोस्टवर कमेंट करणारे किंवा शेअर करणारे शेकडो लोक कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी सोशल मीडियावर घटनेशी निगडीत ‘कंटेंट’चे अक्षरश: ‘पोस्टमॉर्टेम’ केले आहे. त्यात अनेक प्रक्षोभक व आक्षेपार्ह पोस्ट आढळल्या. ‘कलयुग ने अपना रूप धारण कर लिया है’ अशा प्रकारच्या कमेंट्स करत या हिंसेला आणखी चिथावणी देण्यात आल्याची बाब समोर झाली आहे.

सायबर पोलिस ठाण्यातील चारही गुन्हे हे सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे झाले आहेत. यात पोलिसांनी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यू ट्यूबवरील ‘कंटेट’ची बारीक तपासणी केली. हिंसा भडकविण्याचा पॅटर्न चार टप्प्यांमध्ये दिसून आला. पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी झालेल्या आंदोलनाशी निगडीत तथ्यहीन पोस्ट शेअर करण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचे व्हिडीओ पोस्ट, शेअर करून हिंसाचार वाढण्यास हातभार लावण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात हिंसाचारांच्या व्हिडीओजवर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली तर अखेरच्या टप्प्यात हिंसाचाराचे समर्थन करत इतरांना रस्त्यावर उतरण्याबाबत व्हिडीओ व कमेंट्स पोस्ट करण्यात आल्या. पोलिसांकडून या सर्व टप्प्यांतील पोस्टचे विश्लेषण सुरू आहेत. अनेकांनी खोट्या नावांनी अकाऊंट तयार केल्याने त्यांचा शोध घेण्यास अडचण येत आहे.

अजाणतेपणे व्हिडीओ टाकणेदेखील पडले महागात
काही लोकांनी हिंसाचाराबाबत इतरांना माहिती व्हावी, यासाठी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केले. नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी व कायदा-सुव्यवस्था परत रुळावर आणावी, अशी पोस्ट संबंधित युजरने केली होती. मात्र, त्याने व्हिडीओ शेअर केला असल्याने त्याच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन्ही गटातील आरोपींचा समावेश
सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या चारही गुन्ह्यांमध्ये दोन्ही गटातील आरोपींचा समावेश आहे. काही जणांनी हिंसाचाराचे समर्थन करण्याचे टाळले, मात्र धर्मांध पोस्ट केल्या. त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला.

विकी कौशल अन् बॉलिवूडवर टीका भोवली
हिंसाचाराबाबत पोस्ट करत असताना एका युझरने चक्क बॉलिवूड व अभिनेता विकी कौशलविरोधात टीका केली. बॉलिवूडकडून जाणुनबुजून इतिहासाची मोडतोड करून सादर करण्यात येत असल्याची कमेंट संबंधित युझरला भोवली. त्याच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस आयुक्तांविरोधात शिवराळ पोस्ट
इन्स्टाग्रामवर हिंसाचाराचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या एका युझरने पोलिस आयुक्तांविरोधात शिवराळ भाषेचा उपयोग केला. पोलिस आयुक्त व हजारो कर्मचारी जीव धोक्यात घालून नागपूरला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्याविरोधात शिवराळ भाषेचा वापर करणाऱ्याविरोधातदेखील गुन्हा दाखल झाला आहे. त्या अकाऊंटधारकाचा शोध सुरू आहे.

Web Title: Nagpur Violence: Those who posted on social media about the Nagpur violence will be arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर