Nagpur Voilence: समाजकंटक स्थानिकच, बाहेरून आलेले नव्हे; नागपूर पोलीस आयुक्तांचा दावा
By योगेश पांडे | Updated: March 18, 2025 21:45 IST2025-03-18T21:45:06+5:302025-03-18T21:45:43+5:30
पोलिसांकडून या संपूर्ण प्रकारात सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. ज्यांची ओळख पटते आहे त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे.

Nagpur Voilence: समाजकंटक स्थानिकच, बाहेरून आलेले नव्हे; नागपूर पोलीस आयुक्तांचा दावा
योगेश पांडे
नागपूर : सोमवारी रात्री महाल व हंसापुरीमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटना व दंग्यांमध्ये बाहेरील तत्व सहभागी असल्याच्या चर्चांनी जोर पकडला होता. मात्र पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी याचे खंडन केले आहे. एकूण घटनांचा क्रम लक्षात घेतला तर कायदा व सुव्यवस्था बिघविण्याचा प्रयत्न करणारे समाजकंटक स्थानिकच असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पोलीस आयुक्तांनी सोशल माध्यमांच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली. सोशल माध्यमांतून अनेकांनी आक्षेपार्ह व भडकावू पद्धतीचे व्हिडीओ तसेच रील्स फॉरवर्ड-शेअर केले. त्यामुळे अनेकांच्या भावना भडकल्या. ज्या पद्धतीने घटना झाल्या, त्यावरून कुणी बाहेरून आल्याचे दिसून येत नाही. अद्यापपर्यंत तसे पुरावे दिसून आले नाही. दोन्ही गटातील लोक स्थानिकच होते असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
पोलिसांकडून या संपूर्ण प्रकारात सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. ज्यांची ओळख पटते आहे त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. समाजकंटकांनी बाहेरून दगड वगैरे आणले नव्हते. प्रत्यक्षात घटनास्थळाजवळच उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. तेथीलच दगड पोलिसांवर फेकण्यात आले असे त्यांनी सांगितले.
सकाळी शिवाजी पुतळा चौकात औरंगजेबाची कबर हटविण्यावरून आंदोलन झाले होते. त्यावरून एका गटाच्या लोकांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती व माझीदेखील भेट घेतली होती. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांचे समाधान झाले होते. सायंकाळची पूर्ण घटना वेगळी होती. सकाळच्या आंदोलनाशी त्याची कुठलीही लिंक वाटत नाही. संबंधित भागात विविध जातीधर्मांचे लोक राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी दोन गटातील तरुण आमनेसामने आले व त्यातून तणावाला सुरुवात झाली. सोशल माध्यमांमुळे त्यात तेल ओतल्या गेले, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.