Nagpur Violence: चेहरे असेही अन् चेहरे तसेही...दवाखाना, पाच वर्षांची मुलगीही टार्गेट
By योगेश पांडे | Updated: March 18, 2025 22:58 IST2025-03-18T22:58:28+5:302025-03-18T22:58:53+5:30
नागपुरातील हंसापुरीने अनुभवली दहशतीची काळरात्र : अनेक चिमुकले, विद्यार्थी उपाशीपोटीच झोपले

Nagpur Violence: चेहरे असेही अन् चेहरे तसेही...दवाखाना, पाच वर्षांची मुलगीही टार्गेट
योगेश पांडे
नागपूर : दीक्षाभूमी, संघभूमीचे शहर असलेल्या शांतीभूमी नागपूरचे सामाजिक सौहार्द बिघडवून कलंक लावण्याचा काही समाजकंटकांकडून प्रयत्न करण्यात आला. रात्री साडेआठ ते तीन या दरम्यान महाल, भालदारपुरा, हंसापुरी या भागाने ‘न भुतो न भविष्यति’ अशी दहशत अनुभवली. जमावाला चेहरा नसतो असे म्हणतात, मात्र सोमवारी रात्रीच्या जमावाला भावनादेखील नव्हत्या की काय असेच चित्र दिसून आले. समाजकंटकांनी हंसापुरीतील एक दवाखाना फोडला आणि जवळच राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीलादेखील शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. इतकेच नाही तर सायंकाळपासून असलेल्या तणावामुळे अनेक घरांतील चिमुकले, विद्यार्थी उपाशीपोटीच झोपी गेल्याचे वास्तव दिसून आले; परंतु दुसरीकडे समाजातील काही लोकांनी नागपूरचा सर्वधर्मसमभावाचा खरा चेहरादेखील दाखविला आणि पीडितांच्या मदतीसाठी धाव घेत समाजकंटकांचा कट हाणून पाडला.
हंसापुरीत सायंकाळपासूनच तणावाचे वातावरण होते. चिटणीस पार्क, शिवाजी पुतळा चौक, भालदारपुरा येथे जाळपोळ सुरू झाल्यावर पोलिस यंत्रणेचे सर्व लक्ष त्या भागात केंद्रित झाले होते; मात्र हंसापुरीत नियोजनबद्ध पद्धतीने समाजकंटकांनी जमावाला भडकावले व तेथील चौकात ते एकत्रित आले. सेंट्रल एव्हेन्यूला लागूनच असलेल्या वस्तीकडे समाजकंटकांनी मोर्चा वळविला व घाणेरड्या घोषणा देत थेट घरांवर दगडफेक सुरू केली. जुन्या भंडारा मार्गावरील बंडू क्लिनिकमध्ये तोडफोड करत रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधे, पट्टा यांची फेकाफेक करण्यात आली. तर जवळील घरात पहिल्या मजल्यावर उभ्या असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीच्या दिशेने दगड फेकत तिला अश्लील शिवीगाळ करण्यात आली. मुलगी हात जोडून रडत होती, मात्र समाजकंटकांच्या मनाला पाझर फुटला नाही, अशी माहिती विशाल श्रीवास यांनी दिली.
जमावापासून वाचविण्यासाठी स्वकियांविरोधातच धाव
दरम्यान, एका गटाच्या तरुणांच्या जमावाने जाळपोळ सुरू केली असताना दुसऱ्या गटात दहशतीचे वातावरण होते; मात्र पहिल्या गटाशी संबंधितच स्थानिक लोकांनी धाव घेत स्वकियांनाच विरोध केला आणि दुसऱ्या गटातील लोकांचा जीव वाचविण्यात मौलिक भूमिका पार पाडली. हा खरा नागपूरचा चेहरा होता अशी भावना रात्री तीन वाजता हंसापुरीतील नागरिकांनी व्यक्त केली.
मध्यरात्रीनंतरदेखील महिला, पुरुष दारातच
हंसापुरीत रात्री तीन वाजेपर्यंत दहशतीचे वातावरण होते. अनेक घरांतील लहान मुले जेवण न करताच रडून झोपी गेली. जमावाने परत हल्ला करण्याची धमकी दिली असून मुलांच्या रक्षणासाठी आम्ही दरवाजातच बसून असल्याचे शिवसेेनेच्या पदाधिकारी योगिता रेंगे यांनी सांगितले.
चिंध्या, पेट्रोल आले कुठून ?
हंसापुरीत १५ हून अधिक कार, दुचाकी पेटविण्यात आल्या. समाजकंटकांकडून चक्क चिंध्या व पेट्रोलच्या मदतीने वाहने पेटविण्यात आली. तसेच अगदी पहिल्या व दुसऱ्या मजल्यांवरील घरांपर्यंत मोठी दगडे फेकण्यात आली. शिवाय बाटल्यांमध्ये चिंध्या पेटवून त्या फेकण्यात आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात ऐनवेळी चिंध्या व पेट्रोल नेमके कुठून आले, असा सवाल उपस्थित होत आहे.