जखमी अवस्थेत पतीला टीव्हीवर पाहिलं, अन्...; पोलीस पत्नीचे डोळे पाणावले, नेमकं काय घडलं?

By प्रविण मरगळे | Updated: March 18, 2025 17:47 IST2025-03-18T17:46:51+5:302025-03-18T17:47:28+5:30

Nagpur Violence: महाल परिसरात बराच जमाव जमला होता, त्याठिकाणी दगडफेक, वाहनांची तोडफोड, जाळपोळ हे प्रकार सुरू झाल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला.

Nagpur Violence: Saw her husband injured on TV, DCP Police Niketan Kadam wife eyes filled with tears, what really happened? | जखमी अवस्थेत पतीला टीव्हीवर पाहिलं, अन्...; पोलीस पत्नीचे डोळे पाणावले, नेमकं काय घडलं?

जखमी अवस्थेत पतीला टीव्हीवर पाहिलं, अन्...; पोलीस पत्नीचे डोळे पाणावले, नेमकं काय घडलं?

नागपूर - शहरातील महाल परिसरात घडलेल्या हिंसाचारात डीसीपी निकेतन कदम यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हिंसाचारात जखमी झालेल्या डीसीपींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकेतन कदम यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र या घटनेमुळे कदम यांचं कुटुंब काही काळ तणावात होते. टीव्हीवर जखमी पतीला पाहून निकेतन कदम यांच्या पत्नीही पॅनिक झाल्या. या घटनेनंतर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलला धाव घेतली.

डीसीपी निकेतन कदम यांच्या पत्नी म्हणाल्या की, कालची परिस्थिती आमच्यासाठी खूप पॅनिक होती. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याने बरं वाटत आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. पतीवर हल्ला झाल्याचं आम्हाला कुणी सांगितले नाही. मी टीव्हीवर बातम्या पाहत होते तेव्हा निकेतन सर मागे जातायेत, त्यांच्या हाताला पांढरा रूमाल असून त्यातून रक्त वाहतेय हे पाहिले. काहीतरी गंभीर दुखापत झाली आहे हे कळताच मी लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहचली असं त्यांनी सांगितले. टीव्ही ९ च्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. 

तसेच निकेतन यांनी आपल्या देशासाठी, नागपूरसाठी नक्कीच चांगले काम केले आहे. आमच्यासाठी ही गर्वाची बाब आहे. परंतु काळजीपूर्वक आपलं काम करावं असा प्रेमळ सल्लाही पत्नीने डीसीपी निकेतन कदम यांना दिला. तर घरच्यांचा कायम सल्ला असतो, पोलीस खात्यात आम्ही नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटांना तोंड देत असतो. घरच्यांचा सल्ला नेहमीच विचारात असतो. कुटुंबासोबत आपला देशही तितकाच महत्त्वाचा आहे असं निकेतन कदम यांनी म्हटलं.

नेमकं काय घडलं?

महाल परिसरात बराच जमाव जमला होता, त्याठिकाणी दगडफेक, वाहनांची तोडफोड, जाळपोळ हे प्रकार सुरू झाल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. अरूंद गल्ल्यातून पोलीस जात होते. त्या एका गल्लीत पोलिसांची तुकडी अडकली होती. अचानक १०० जणांचा जमाव समोर आला. त्यांच्याकडे काठ्या होत्या, पेट्रोल होते. आग पेटवण्याचं साहित्य होते. त्या जमावाला थांबवण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यातील एकाकडे कुऱ्हाड होती. त्याने माझ्यावर हल्ला केला तेव्हा मी हाताने थांबवण्याचा प्रयत्न केला. काल खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक कंटक तिथे जमले होते असं जखमी निकेतन कदम यांनी सांगितले. 

दरम्यान, पोलीस आयुक्तांसह विविध टीम सर्व परिसरात होत्या. अरूंद गल्ली असल्याने तो जमाव कुठल्याही दिशेने येत होता. त्यांच्याकडे शस्त्रेही होती. नागपूर पोलिसांनी अतिशय चांगल्यापद्धतीने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. काही अधिकारी, कर्मचारी जखमी झाले होते. मुख्यमंत्र्‍यांनी कॉल करून नागपूर पोलिसांचे कौतुक केले. पालकमंत्रीही आले त्यांनीही विचारपूस केली. ती परिस्थिती भयानक होती. आमची टीम सुखरूप तिथून बाहेर पडली असं निकेतन कदम यांनी म्हटलं. 

Web Title: Nagpur Violence: Saw her husband injured on TV, DCP Police Niketan Kadam wife eyes filled with tears, what really happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.