नागपूर हिंसाचार : वणव्याची प्रतीक्षा नको, ठिणगीवरच उपाय हवा

By योगेश पांडे | Updated: March 24, 2025 10:45 IST2025-03-24T10:44:57+5:302025-03-24T10:45:56+5:30

Nagpur : मागील तीन ते चार दशकांत महाराष्ट्रात अशा अनेक घटना झाल्या. विशेषतः भिवंडीत तर असे प्रकार अनेकदा घडले. आता वणवा विझविण्याऐवजी ठिणगीच पेटणार नाही, यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे व त्यासाठी अशा संवेदनशील ठिकाणी भिंवडी पॅटर्न प्रभावी पद्धतीने राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Nagpur violence: Don't wait for a wildfire, we need to act on the spark itself | नागपूर हिंसाचार : वणव्याची प्रतीक्षा नको, ठिणगीवरच उपाय हवा

Nagpur violence: Don't wait for a wildfire, we need to act on the spark itself

योगेश पांडे
नागपूर :
सोमवारी रात्री नागपुरात 'न भूतो न भविष्यति' अशी स्थिती उ‌द्भवली व सामाजिक समरसतेसाठी आदर्श झालेल्या महालात हिंसाचार व जाळपोळ झाली. यासंदर्भात आता पंचनामा, चौकशी, अटकसत्र असे प्रशासकीय सोपस्कार होतच राहतील. खरे दोषी कोण, हेदेखील समोर येईल. मात्र, एरवी शांत दिसणाऱ्या लोकांनी क्रौर्यालाही मान खाली घालावी लागेल असे कृत्य का केले? अशा घटनांमागे समाजाची मानसिकता काय असते? यात अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेणाऱ्या तरुणांचा दोष आहे की समस्या माहिती असूनदेखील हव्या त्या प्रमाणात बंदोबस्त न लावणारे पोलिस प्रशासनदेखील तेवढेच जबाबदार आहे, अशा विविध प्रश्नांचे मोहोळ उठले आहे. मागील तीन ते चार दशकांत महाराष्ट्रात अशा अनेक घटना झाल्या. विशेषतः भिवंडीत तर असे प्रकार अनेकदा घडले. आता वणवा विझविण्याऐवजी ठिणगीच पेटणार नाही, यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे व त्यासाठी अशा संवेदनशील ठिकाणी भिंवडी पॅटर्न प्रभावी पद्धतीने राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


निवृत्त विशेष पोलिस महानरीक्षक सुरेश खोपडे यांच्या कार्यकाळात हा भिवंडी पॅटर्न राबविण्यात आला होता. अतिशय संवेदनशील परिसर असलेल्या भिवंडीत दंगली होणे किंवा समाजाच्या भावनेचा उद्रेक होणे, यांचे प्रमाण वाढले होते. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी यांच्यावर अंकुश ठेवणे कठीण झाले होते. अशा घटना थांबवायच्या असतील तर लोकांच्याच मनात प्रशासनाबद्दल विश्वास उत्पन्न करणे गरजेचे होते. त्यामुळे प्रत्येक वॉर्ड किंवा गावाच्या स्तरावर मोहल्ला कमिटींची स्थापना करण्यात आली. यात सर्वधर्मीय आणि प्रत्येक वर्गातील लोकांचा समावेश करण्यात आला. महिला, पुरुष, सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे यांच्यातील प्रतिनिधींची दर पंधरवड्चाला पोलिस निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन परिसरात कुठल्या समस्या आहेत किंवा कायद्याला कुठल्या गोष्टी धोकादायक आहेत, याची माहिती घेण्यात येई. 


जर काही तणाव असेल तर आपापसातल्या चर्चेत तो सोडविला जाई आणि हळूहळू लोकांच्या मनात पोलिस प्रशासन त्यांच्या सोबत आहे, असा विश्वास निर्माण झाला. मोहल्ला कमिटींच्या या प्रयत्नाला यश मिळाले व भिवंडीतील वातावरण सामान्य झाले. नागपुरात या घटनेमुळे समाजामध्ये एक मानसिक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रयत्नांना वेळीच थांबविणे सर्वात महत्त्वाचे आहे.


अचानकपणे जमावाच्या हिंसक होण्याची कारणे काय ?

  • मुळात सोमवारी जी घटना झाली त्याच्यामागील पार्श्वभूमी समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. आता तेथे वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या आणि त्यातून जनतेची दिशाभूल करण्यात आली होती. मात्र, जर जनतेत अशा अफवा पसरत आहे हे आणि घटनास्थळी अचानकपणे लोक एकत्रित जमत आहेत, हे पोलिसांना दिसत होते, तर यावर त्वरित पावले उचलायला हवी होती. तसे पाहिले तर आपला समाज हा शांतीप्रिय समाज आहे.
  • मात्र, ज्यावेळी अफवांमुळे लोकांमध्ये उन्माद निर्माण केला जातो तेव्हा व्यवस्थांपेक्षा ते स्वतःच बदल घडवून आणू शकतात, अशा मानसिकतेतून वागतात. प्रस्थापित व्यवस्थेवरील त्यांचा विश्वास हरवलेला असतो. समाजमनात अशाप्रकारचा उद्रेक होतो तेव्हा सारासार विचार करण्याची मानसिकताच नसते.
  • जर काही संशयास्पद गोष्ट आढळली आणि यातून आपल्याला धोका आहे, असे वाटले तर मग कुठल्याही परिणामांची पर्वा न करता कोणाचाही जीव घ्यायला जमाव मागेपुढे पाहत नाही. घटनास्थळी अनेकदा जमावाच्या आरोळ्या आणि ओरडण्याने वातावरणदेखील प्रक्षोभक झाले असते. मग भावनेच्या भरात विवेक बाजूला पडतो आणि हातून गुन्हा होतो.
  • यात शिक्षण, लिंग, जात, धर्म यांसारखे भेदभाव बाजूला पडतात आणि जिकडे लोक हल्ला करतील तिथे लोकांचा समूहच्या समूह हल्ला करतो.


भविष्यातील धोका लक्षात घ्या

  • आपल्या देशातील प्रशासकीय आणि सामाजिक व्यवस्था पाहता अराजकता माजू शकणे कठीण आहे. आपला समाज एकरूप नाही, त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात असंतोष उत्पन्न झाला तरी त्याला दाबणे सहज शक्य होईल.
  • मात्र, सातत्याने प्रशासनाबद्दल जनतेच्या भावना अशा पद्धतीने उफाळून बाहेर आल्या तर समाजात अस्थिरता निर्माण होईल, हे निश्चित. प्रस्थापित व्यवस्थेबद्दलचाच अविश्वास निर्माण होता कामा नये कारण मोठी आग पेटायला ठिणगीच कारणीभूत ठरते.


पोलिसांनो, जनतेशी संवाद वाढवा

  • सर्वात अगोदर तर जनता आणि पोलिस प्रशासन यांच्यातील संवाद वाढणे जास्त गरजेचे आहे. याकरता जनतेत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.
  • नागरिकांना कुठल्या गोष्टीचे भय आहे का, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना का आहे, याची माहिती काढायला हवी.
  • मोहल्ला कमिटी किंवा कम्युनिटी पोलिसिंग यासारखे प्रकल्प वॉर्ड पातळीवर सुरू करायला हवेत.
  • नागरिकांसोबत मैत्री वाढवण्यासाठी त्यांच्या आनंदात आणि दुःखात सहभागी व्हा.
  • त्यांच्या सण-समारंभात त्यांना मदत करा.
  • पोलिस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकांकडे दुर्लक्ष न करता त्यांना सन्मानाची वागणूक द्या.
  • अफवा पसरल्या असतील तर त्यांच्यातील मूळ शोधण्याचा प्रयत्न करा आणि सोबतच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Nagpur violence: Don't wait for a wildfire, we need to act on the spark itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर