नागपूर विद्यापीठ : सर्व परीक्षा एक महिना पुढे ढकलणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 10:53 PM2021-05-06T22:53:41+5:302021-05-06T22:54:59+5:30

Nagpur University exams be postponed राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या हिवाळी परीक्षा तसेच २४ मेपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी परीक्षा एक महिन्याने पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

Nagpur University: Will all exams be postponed for a month? | नागपूर विद्यापीठ : सर्व परीक्षा एक महिना पुढे ढकलणार?

नागपूर विद्यापीठ : सर्व परीक्षा एक महिना पुढे ढकलणार?

Next
ठळक मुद्देकोरोना स्थितीमुळे महाविद्यालये, विद्यार्थ्यांकडून होत होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या हिवाळी परीक्षा तसेच २४ मेपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी परीक्षा एक महिन्याने पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी अधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाची स्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलण्याबाबत महाविद्यालये, विद्यार्थी तसेच प्राधिकरण सदस्यांकडून वारंवार मागणी होत होती.

विद्यापीठाने ३० एप्रिलपर्यंतच्या हिवाळी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परंतु मेच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अभियांत्रिकी, फार्मसीच्या परीक्षांबाबत काहीच निर्णय झालेला नव्हता. सोबतच महाविद्यालय स्तरावरदेखील ५ ते २० मेदरम्यान परीक्षा घेण्याचे निर्देश काढले होते. यात प्रात्यक्षिक परीक्षांचादेखील समावेश होता. परंतु अनेक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे परीक्षा घेणे व देणे यात अडचणी येत आहेत. हीच बाब लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या या मागणीने जोर धरला होता. प्राचार्य फोरमनेदेखील यासंदर्भात विद्यापीठाकडे निवेदन सादर केले होते.

प्राधिकरण सदस्यांनीदेखील कुलगुरूंकडे हा मुद्दा लावून धरला होता. हिवाळी परीक्षा घेणे व उन्हाळी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेणे या प्रक्रियेत अडचणी येत आहेत. ही बाब आम्ही कुलगुरूंना सांगितली. त्यांनादेखील यातील तांत्रिक मुद्दे पटले व परीक्षा एका महिन्यासाठी पुढे ढकलण्यात येतील, असे सांगितल्याचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.आर.जी. भोयर यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात विद्यापीठाने अधिकृत परिपत्रक जारी केलेले नाही. त्यामुळे गुरुवारच्या परीक्षा होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अर्ज भरण्यासदेखील मुदतवाढ मिळणार

सध्या महाविद्यालये कोरोना निर्बंधांमुळे बंद असल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याचे मोठे आव्हान महाविद्यालयांसमोर आहे. काही महाविद्यालयांनी तर विद्यार्थ्यांनाच बोलविले. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. उन्हाळी परीक्षेसाठी १८ मेपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. मात्र, गावाला गेलेले विद्यार्थी किंवा आजारी असलेले विद्यार्थी अर्ज भरू शकत नाहीत. महाविद्यालयांमधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमण झाले आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे परीक्षांचे अर्ज १८ मेपर्यंत विद्याापीठाकडे जमा करणे अशक्य आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासदेखील मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. उन्हाळी परीक्षांचे नियोजन जूनमध्ये करण्याची विद्यापीठाची तयारी सुरू आहे.

Web Title: Nagpur University: Will all exams be postponed for a month?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app