नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चाैधरी तडकाफडकी निलंबित

By जितेंद्र ढवळे | Published: February 21, 2024 10:34 PM2024-02-21T22:34:38+5:302024-02-21T22:35:39+5:30

राज्यपालांनी केली कारवाई : बाविस्कर समितीने ठेवला होता ठपका

nagpur university vice chancellor subhash chaudhary has been summarily suspended | नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चाैधरी तडकाफडकी निलंबित

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चाैधरी तडकाफडकी निलंबित

नागपूर : वादग्रस्त कारभारामुळे चर्चेत आलेले राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांचे निलंबन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबतचे आदेश दिले. अशाप्रकारे कुलगुरूंना निलंबित करण्यात आल्याची नागपूर विद्यापीठातील ही पहिलीच घटना आहे.

सूत्राच्या माहितीनुसार, राज्यपाल बैस यांच्या कार्यालयात कुलगुरू डाॅ. चाैधरी यांच्या विराेधातील वेगवेगळ्या तक्रारींच्या अनुषंगाने बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर त्यांना निलंबित करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले. या संदर्भातील मेल बुधवारी सांयकाळी विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाला. तसेच राज्यपालांनी गडचिरोली येथील गाेंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.

यामुळे झाली कारवाई?

१) विद्यापीठाने काळ्या यादीत टाकलेल्या एमकेसीएल कंपनीला देण्यात आलेले कंत्राट.
२) निविदा न काढता वेगवेगळ्या कामांचे कंत्राट.
३) प्राध्यापकांकडून पैसे वसुलीच्या प्रकरणात अडकलेले जनसंवाद विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांची पाठराखण करणे.
४) यांत्रिक अभियांत्रिकी शाखेतील डॉ. प्रशांत कडू यांची आंतरविद्याशाखीय शाखेच्या अधिष्ठातापदी केलेली निवड.
५) नागपुरचे आ.प्रवीण दटके यांनी कुलगुरू डॉ.चौधरी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित सरकारचे लक्ष वेधले होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या आदेशाकडे डोळेझाक

विद्यापीठाने परीक्षांच्या कामातून एमकेसीएल कंपनीला बरखास्त केल्यानंतरही कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डाॅ. चाैधरी यांच्या निर्देशाने एमकेसीएल कंपनीला निविदा न काढता पुन्हा कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट रद्द करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचना केल्यानंतरही एमकेसीएलचे काम कायम ठेवण्यात आले. याबाबतही राज्यपालांकडे तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. त्यामुळे राज्यपाल, तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रकरणांच्या चाैकशीसाठी स्थापन झालेल्या उच्च तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीने अहवालात डाॅ. चाैधरी यांच्या कारभारावर गंभीर ताेशेरे ओढले हाेते. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह काेश्यारीनंतर नव्याने आलेल्या रमेश बैस यांनाही हा अहवाल सादर करण्यात आला होता.

राजीनामा देण्याच्या हाेत्या सूचना

डाॅ. चाैधरी यांनी अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांनी कुलगुरू चौधरींना राजीनामा देण्यास सांगितले हाेते. गतवर्षी मार्च महिन्यात तशा चर्चा विद्यापीठ वर्तुळात हाेत्या. मात्र, डाॅ. चाैधरी यांनी राजीनामा दिला नाही.

चौधरी मुंबईत, बोकारे नागपुरात दाखल

राज्यपालांच्या आदेशानंतर गाेंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे बुधवारी रात्री ८ वाजेदरम्यान नागपूर विद्यापीठात दाखल झाले. त्यांनी डॉ. चौधरी यांच्या अनुपस्थितीत प्रभारी कुलगुरु पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विविध विषयांची माहिती जाणून घेतली. मुंबईला सुनावणीसाठी गेलेले डॉ.चौधरी नागपुरात दाखल होण्यापूर्वीच डॉ.बोकारे यांनी गडचिरोली येथून नागपुरात दाखल होत कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यामुळे विद्यापीठ वर्तुळात मात्र तर्क वितर्क लावले जात आहेत.

Web Title: nagpur university vice chancellor subhash chaudhary has been summarily suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर