नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवांना परीक्षेचा मोह आवरेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 22:42 IST2019-11-30T22:40:06+5:302019-11-30T22:42:55+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांचा परीक्षा विभागाचा मोह सुटत नाही, असेच काहिसे चित्र सध्या दिसत आहे. म्हणूनच ते मुख्य प्रशासकीय कार्यालयापेक्षा जास्त वेळ परीक्षा भवनाच घालवित असल्याचे दिसत आहे.

नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवांना परीक्षेचा मोह आवरेना!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांचा परीक्षा विभागाचा मोह सुटत नाही, असेच काहिसे चित्र सध्या दिसत आहे. म्हणूनच ते मुख्य प्रशासकीय कार्यालयापेक्षा जास्त वेळ परीक्षा भवनाच घालवित असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर विभागाच्या कामकाजातही हस्तक्षेप करीत आहेत. या विभागात त्यांची दिसणारी ही आवड परीक्षा भवनात चर्चेची ठरली आहे.
डॉ. खटी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालक पदावर होते तेव्हा त्यांचा अधिकाधिक वेळ परीक्षा भवनाऐवजी मुख्य प्रशासकीय कार्यालयात जात असे. विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा करायची असली तर त्यांना मुख्य प्रशासकीय कार्यालयात जावे लागत असे. कुलसचिव पदाचा प्रभार मिळाल्यानंतर डॉ. खटी आता परीक्षा भवनात दिसायला लागले आहेत. प्रत्यक्षात प्रभारी कुलसचिवांचा परीक्षा विभागाशी कसलाही संबंध नसतो. परीक्षा विभागाचे कामकाज व निर्णय घेण्याची जबाबदारी परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांवर असते. कुलसचिव पदाकडे फक्त प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी असते. असे असतानाही डॉ. खटी यांचे परीक्षा भवनात नियमितपणे येणे व तेथील कामकाजात हस्तक्षेप करणे समजण्यापलीकडचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते परीक्षा विभागात पीएचडी सेल, गोपनीय शाखा व खाजगी निर्णयात अधिक रुची दाखवित असतात. डॉ. खटी यांची मूळ नियुक्ती विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्थेमध्ये (एलआयटी) आहे. कुलसचिव पदाचा प्रभार मिळाल्यानंतर त्यांनी कधीच एलआयटीत जाण्याची तसदी घेतली नाही. महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाचे कुलपती डॉ. सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलपती डॉ. विनायक देशपांडे यांना या संदर्भात कल्पना नाही. यावर डॉ. खटी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला मात्र, होऊ शकला नाही.