नागपूर विद्यापीठ अब्जाधीश

By Admin | Updated: June 13, 2017 01:42 IST2017-06-13T01:42:49+5:302017-06-13T01:42:49+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये सुविधांच्या नावाने बोंबच असते.

Nagpur University Billionaire | नागपूर विद्यापीठ अब्जाधीश

नागपूर विद्यापीठ अब्जाधीश

विद्यार्थ्यांना सुविधा मात्र नाहीत : व्याजावरच मिळतात कोट्यवधी रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये सुविधांच्या नावाने बोंबच असते. अगदी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या परिसरातदेखील आवश्यक त्या सुधारणा दिसून येत नाही. यासाठी विद्यापीठाकडून निधीचे कारण देण्यात येते. मात्र प्रत्यक्षात नागपूर विद्यापीठाकडे कोटी नव्हे तर अब्ज रुपयांच्या ठेवी आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी यात वाढच होत चालली आहे. अशा स्थितीत विद्यार्थी हितासाठी निधी खर्च करण्यासाठी विद्यापीठ तत्काळ निर्णय का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर विद्यापीठाकडे माहिती मागितली होती. नागपूर विद्यापीठाकडे किती जमीन आहे, जमिनीची बाजारभावानुसार किंमत किती आहे, विद्यापीठाच्या बँकांमध्ये विद्यापीठाच्या किती रुपयांच्या ठेवी आहेत, ठेवींवर विद्यापीठाला व्याज किती मिळते तसेच व्याजाचा उपयोग कशासाठी करण्यात येतो आणि विद्यापीठाला किती दान मिळाले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१५-१६ या कालावधीत नागपूर विद्यापीठाकडे ५ अब्ज ५६ कोटी ३५ लाख ९ हजार ९०७ रुपयांच्या ठेवी होत्या. २०१२-१३ मध्ये हेच प्रमाण २ अब्ज ५ कोटी ८५ लाख ९३ हजार २५२ रुपये इतके होते. चार वर्षांच्या कालावधीत विद्यापीठांच्या ठेवींमध्ये ३ अब्ज ५० कोटी ४९ लाख १६ हजार ६५५ रुपयांची वाढ झाली. वाढीची टक्केवारी १७० टक्के इतकी होती. मात्र या प्रमाणात विद्यापीठात विकास झालेला दिसून आलेला नाही.
परीक्षा विभागाचे संगणकीकरण आणि ‘आॅनलाईन’ व्यवस्था सुरू करण्यात आली. मात्र विविध विभाग, वसतिगृहे, कार्यालये यांच्यातील मूलभूत समस्या कायमच आहे. विद्यार्थ्यांना हक्काचे विद्यार्थी माहिती केंद्रदेखील उपलब्ध होऊ शकलेले नाही. ‘कॅम्पस’मध्ये अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. वसतिगृहांची अवस्थादेखील फारशी चांगली नाही. अशा स्थितीत या ठेवींचा उपयोगच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चार वर्षांत एक अब्जाहून अधिक व्याज
नागपूर विद्यापीठाला दरवर्षी या ठेवींमधून मिळणाऱ्या व्याजाचा आकडाच कोट्यवधी रुपयांत असतो. २०१२-१३ ते २०१५-१६ या कालावधीत नागपूर विद्यापीठाला व्याजापोटीच १ अब्ज ४ कोटी ७४ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम मिळाली. २०१५-१६ मध्ये मिळालेला व्याजाचा आकडा ४३ कोटी ८५ लाख ३७ हजार इतका होता. व्याजाच्या रकमेची पुनर्गुंतवणूक करण्यात येते, असे उत्तर विद्यापीठातर्फे देण्यात आले आहे. मात्र हीच रक्कम विद्यार्थ्यांच्या हितासाठी लावली तर विद्यापीठाचा दर्जा नक्कीच सुधारू शकतो.

पावणेसाठ लाखांचे दान
नागपूर विद्यापीठाला दान देणाऱ्यांचे प्रमाणदेखील बरेच आहे. २०१२ ते २०१६ या कालावधीत नागपूर विद्यापीठाला ५९ लाख ७५ हजार रुपयांचे दान प्राप्त झाले. २०१३-१४ मध्ये सर्वाधिक २८ लाख ५० हजारांचे दान मिळाले.

Web Title: Nagpur University Billionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.