लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातून दुचाकी चोरी करून त्यांची मध्य प्रदेशात विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एका आरोपीकडून ११ दुचाकी तर दुसऱ्याने विकलेल्या ३१ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तहसील पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
१६ जुलै रोजी रात्री सुदर्शन कावडे (२६, जुना भंडारा मार्ग, बाजीराव गल्ली, गांजाखेत चौक) यांची दुचाकी घरासमोरून चोरी गेली होती. तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रल्हाद ऊर्फ करण चोखेलाल चंद्रवंशी (३६, ब्राह्मणी, गोपालगंज, शिवनी, मध्य प्रदेश) याला डागा इस्पितळाजवळून ताब्यात घेतले होते. त्याच्याजवळून ११ वाहने जप्त करण्यात आली होती. त्याने ब्रजकिशोर सुखलाल चंद्रवंशी (३९, ब्राह्मणी, गोपालगंज, शिवनी) हादेखील त्याच्या सहकारी असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी त्याचादेखील शोध घेतला व अटक केली. त्याने ३१ दुचाकी विविध लोकांना विकल्याची माहिती दिली.
त्या सर्व ३१ दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपीने तहसीलमधून दोन, गणेशपेठेतून नऊ, लकडगंजमधून पाच, सदरमधून चार, कळमन्यातून तीन, तर सीताबर्डी-जुनी कामठी-पारडी-वाठोडा व कोतवालीतून प्रत्येकी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. २९ गुन्हे उघडकीस आले असून इतर वाहनांबाबत माहिती घेणे सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख, राहुल वाढवे, रसुल शेख, संजय शाहू, संदीप गवळी, सुनील सेलोकर, वैभव कुलसंगे, कुणाल कोरचे, महेंद्र सेलूकर, संदीप सिरफुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.