नागपुरात विद्यार्थ्यांसह दोघांनी लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 21:42 IST2020-08-07T21:41:15+5:302020-08-07T21:42:20+5:30
दहावीची परीक्षा नुकतीच पास करणाऱ्या एका विद्यार्थ्यांसह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसी आणि लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी या घटना घडल्या.

नागपुरात विद्यार्थ्यांसह दोघांनी लावला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावीची परीक्षा नुकतीच पास करणाऱ्या एका विद्यार्थ्यांसह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसी आणि लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी या घटना घडल्या. एमआयडीसीतील शिवसदन सीताराम कडव यांच्याकडे त्यांचा भाचा कार्तिक विजय तुमसरे (वय १६) हा शिकण्यासाठी राहत होता. कडव यांचे घर बहुजन नगर इसासनी येथे असून दुसऱ्या भागात त्यांचे दुकान आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे कडव त्यांच्या दुकानात गेले. सायंकाळी ५.१० च्या सुमारास त्यांना घरून फोन आला. कार्तिक तुमसरेने गळफास लावून घेतल्याची माहिती मिळताच ते घरी पोहोचले. यावेळी त्यांचा भाचा कार्तिक हा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. तो कसलीही हालचाल करत नसल्याचे पाहून कडव यांनी पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस तेथे पोहोचले. कार्तिकने नुकतीच दहावीची परीक्षा पास केली होती. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते स्पष्ट झाले नाही. एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना घडली. चेतन नवलकिशोर केवलिया (वय २७) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. चेतन सर्पमित्र होता. तो ढोलताशा पथकातही जायचा. गुरुवारी घरी कार्यक्रम असल्यामुळे चेतन केवलिया याची बहीण सासरहून आली होती. दुपारपर्यंत पूजाअर्चा आणि जेवण झाल्यानंतर बहीण सासरी निघून गेली. तर आईवडील दुसरीकडे कामानिमित्त गेले. रात्री १० च्या सुमारास ते परत आले. तेव्हा आतून दार बंद होते. वडिलांनी दार ठोठावून, मोबाईलवर फोन करूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने दाराची कडी तोडून आत बघितले. तेव्हा चेतन केवलिया गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. नवलकिशोर केवलिया यांनी लकडगंज पोलिसांना माहिती कळविली. त्यावरून उपनिरीक्षक संदीप काळे यांनी घटनास्थळ गाठले. चेतन केवलियाचा मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिस पुढील तपास करीत आहेत.