नागपुरातील वाहतूककोंडी रुग्णांसाठी पडली भारी; केमोथेरपीसाठी जाणारे अडकले, मंगळवारी मध्यरात्रीनंतरदेखील अनेकांची पायपीट
By योगेश पांडे | Updated: October 30, 2025 08:55 IST2025-10-30T08:54:48+5:302025-10-30T08:55:16+5:30
आंदोलनकर्त्यांमध्ये माणुसकी हरविली का? असा संतप्त सवाल

नागपुरातील वाहतूककोंडी रुग्णांसाठी पडली भारी; केमोथेरपीसाठी जाणारे अडकले, मंगळवारी मध्यरात्रीनंतरदेखील अनेकांची पायपीट
योगेश पांडे
नागपूर : शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आदी मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील आंदोलनामुळे वर्धा मार्गावर मंगळवारी दुपारपासूनच कोंडी झाली आणि त्याचा फटका हजारो नागरिकांना बसला. केवळ सामान्य जनताच नव्हे, तर अनेक रुग्णांनादेखील यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. या मार्गाजवळ असलेल्या रुग्णालयांत उपचारांसाठी जाणारे रुग्ण कोंडीतच अडकले. त्यात काही कॅन्सरग्रस्तही होते.
मंगळवारी मध्यरात्री अनेक रुग्णवाहिका कोंडीत अडकल्या. शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करावे, मात्र त्याला राजकीय स्वरूप देत स्वतःची पोळी भाजणाऱ्या नेत्यांमधील माणुसकी हरविली आहे का, असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाइकांनी व्यक्त केला. मंगळवारी दुपारी पावणेचार वाजतापासून सुरू झालेली वाहतूककोंडी बुधवारपर्यंत कायम होती. नागपूरकडे येणाऱ्या व नागपुरातून बाहेर जाणाऱ्या मार्गावर अनेक रुग्णवाहिकादेखील अडकल्या होत्या. त्यातील रुग्णांचे या कोंडीमुळे प्रचंड हाल झाल्याचे दिसून आले.
बच्चू कडूंना मंत्र्यांचे फोन, मुंबईत न जाण्याची भूमिका
बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील आंदोलनाने नागरिक अक्षरशः वेठीस धरले गेले आहेत. हे आंदोलन थांबविण्यात यावे, यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील कडू यांना विनंती केली. मात्र कडू यांनी मुंबईत जाणार नाही, सरकारच्या मंत्र्यांनी नागपुरात येऊन चर्चा करावी, अशी भूमिका घेतली.
चार्टर्ड फ्लाईटने बोलविले अन् ठोकून दिले तर?
काहीही झाले तरी आम्ही आंदोलन थांबवू शकत नाही. बाकी आंदोलनात ऑन द स्पॉट निर्णय घेतला गेला. मात्र आम्हाला मुंबईला बोलविण्याचा आग्रह संशयास्पद आहे. आम्हाला चार्टर्ड फ्लाईटने बोलविले आणि ठोकून दिले तर काय करता, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.
या आंदोलनामुळे लोक वेठीस धरले गेले आहेत. याबाबत कडू यांना विचारणा केली असता, लोकांना वेठीस धरण्याची आमची मानसिकता नाही, असे म्हणाले.